क्राईम न्युज
फलटणमध्ये मोटारसायकल चोरी प्रकरणाचा छडा ; 2 आरोपी जेरबंद

(जावली/ अजिंक्य आढाव )फलटण शहरात घडलेल्या मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी वेगाने छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कसबा पेठ, ब्राम्हण गल्ली येथील गणेश अपार्टमेंट समोर पार्क केलेली सुमारे ४५ हजार रुपये किंमतीची होंडा अॅक्टिव्हा (MH 11 DJ 4487) ही स्कुटी दि. २६ मार्च २०२६ रोजी रात्री ११.३० ते २७ मार्च सकाळी ७.०० या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती.
याबाबत तक्रारदार भारत काशिनाथ डोंबे (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ११०/२०२६, बीएनएस कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने संशयितांचा शोध घेऊन यश संदीप ढालपे (वय २३, रा. शिवाजीनगर, फलटण) व प्रफुल्ल चंद्रकांत हरीहर (वय २६, रा. मंगळवार पेठ, फलटण) या दोघांना ताब्यात घेतले.
कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपींनी स्कुटी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली स्कुटी तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली विना नंबरची स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली आहे.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.




