ताज्या घडामोडी

गोकुळच्या यशस्वी दुग्ध मॉडेलची श्रीमंत संजीवराजेंकडून पाहणी; शेतकरी हिताच्या योजनांची घेतली सविस्तर माहिती

(फलटण /प्रतिनिधी ): कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि., कोल्हापूर या गोकुळ ब्रँड साठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र राज्यातील व्यवस्थितरित्या सुमारे ६३ वर्ष अखंडित सुरु असलेल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना नवनवीन योजनाद्वारे लाभ देणाऱ्या संस्थेला येथील गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., चे संस्थापक व विद्यमान चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य यांनी सदिच्छा भेट देवुन माहिती घेत सहकारातील या अग्रगण्य संस्थेचे कौतुक करीत समाधान व्यक्त केले.

गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य यांचे यथोचित स्वागत करुन या दुग्ध प्रकल्पासंदर्भात सविस्तर माहिती दिली. दूध उत्पादक शेतकरी आणि गोधन यासाठी सुरु असलेल्या विविध योजना आणि संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या सर्व प्रकल्पासंदर्भात माहिती दिली, यावेळी संस्थेवरील प्रशासक मंडळ अध्यक्ष तथा जिल्हा निबंधक संजयकुमार सुद्रिक, सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या संस्थेने स्थापनेपासून आजपर्यंत दूध संकलन, विस्तार सेवा, पशू आरोग्य, पशुपालन, प्रजनन, दूध प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आणि विपणन या क्षेत्रांत अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. सध्या गोकुळकडे दररोज १७ लाख लिटर क्षमतेचा आधुनिक दुग्ध प्रकल्प आहे. तसेच उदगाव, ता. शिरोळ येथे उपग्रह दुग्ध प्रकल्प आणि स्वतःची ४ शीतकरण केंद्रे आहेत. या सर्वांची एकत्रित दूध साठवण क्षमता दररोज ८ लाख लिटर इतकी आहे. नवी मुंबई येथे आधुनिक पॅकिंग युनिटही कार्यरत आहे. दूध उत्पादन वाढीसाठी गोकुळकडे सध्या ४६ फिरते पशुवैद्यकीय मार्ग (मोबाईल व्हेटरिनरी रुट्स) आणि २६० क्लस्टर ए. आय. केंद्रे कार्यरत आहेत. कागल – हातकणंगले फाईव्ह स्टार एमआयडीसी येथे ‘महालक्ष्मी’ या लोकप्रिय ब्रँडअंतर्गत दररोज ४५० मेट्रिक टन क्षमतेचा अत्याधुनिक पशुखाद्य प्रकल्प मार्च २०११ पासून सुरु आहे.

याशिवाय, मुडशिंगी, ता. करवीर येथे दररोज २०० मेट्रिक टन क्षमतेचा जुना पशुखाद्य प्रकल्पही एकाच वेळी कार्यरत आहे. एनडीडीबीच्या सहकार्याने गोकुळने एकूण मिश्र आहार (TMR – Total Mixed Ration) प्रकल्प सुरु केला असून, तो मुडशिंगी प्रकल्पात दि. ७ डिसेंबर २०१८ पासून कार्यरत आहे. सन २०२२ दरम्यान गोकुळने शेणखत प्रकल्पालाही सुरुवात केली असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.गोकुळला महाराष्ट्र शासनाकडून ३ वेळा “सहकार भूषण” पुरस्कार प्राप्त झाला आहे. सर्वाधिक कार्यरत महिला दुग्ध सहकारी संस्थांसाठी NDDB उत्कृष्टता पुरस्कार प्राप्त डेअरी प्रकल्पाकडे ISO 22000 : 2018 अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र आहे. ४५० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेच्या पशुखाद्य प्रकल्पाकडे ISO 9001 : 2015 प्रमाणपत्र आहे. महाराष्ट्र शासनाचा डेअरी क्षेत्रातील “ऊर्जा बचत पुरस्कार” सलग 7 वेळा प्राप्त. उत्पादन निर्यातीसाठी निर्यात तपासणी परवान्याचे सातत्याने नूतनीकरण करण्यात येते. १९८८ ते २००६ या कालावधीत १४ वेळा राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार या संस्थेने प्राप्त केले असून गोकुळच्या “मिल्क रिप्लेसर” या नवकल्पनेस पेटंट प्राप्त झाले आहे.
दूध उत्पादकांना प्रत्येक विक्री रुपयामागे 76 ते 82 टक्के रक्कम किंमत व सेवांच्या स्वरुपात परत दिली जाते. NDDB कडून “क्वालिटी मार्क” प्रमाणपत्र प्राप्त आहे.
आर्थिक वर्ष २०२४ – २०२५ मधील उलाढाल ३९६६. २८कोटी (तात्पुरती) इतकी आहे. सन २०२४ – २५ मध्ये डेअरी प्रकल्पामध्ये ६२.७८ कोटी लिटर दूध हाताळण्यात आल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.

गोकुळच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अद्वितीय मादी वासरु (कालवड) संगोपन, दूध उत्पादकांसाठी भविष्य निर्वाह निधी, शेतकरी विमा पॅकेज, स्वच्छ दूध उत्पादन कार्यक्रमाची अंमलबजावणी, ओपन शेड संकल्पना,चाऱ्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी बॅग सायलेज संकल्पना,म्हैस व गायीच्या दुधासाठी “गोकुळ श्री” स्पर्धा, ६० ठिकाणी BMC युनिट्सद्वारे दूध संकलन, महिला दुग्ध सहकारी नेतृत्व विकास कार्यक्रम, जिल्ह्यात ३ ठिकाणी मायक्रो प्रशिक्षण केंद्रे, प्रगतशील शेतकऱ्यांकडून दूध उत्पादकांना दूध संकलन केंद्रावर एकदिवसीय प्रत्यक्ष प्रशिक्षण, महिला दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी स्वयं-साहाय्य गट व बायोगॅस योजना, कार्बन क्रेडिट योजनेअंतर्गत ७३४७ बायोगॅस युनिट्सची स्थापना, २०१७ पासून एथेनो पशुवैद्यकीय औषधोपचार (EVM) पद्धतीचा अवलंब, ५० किलो/तास क्षमतेचे EVM उत्पादन युनिट स्थापित, NDDB च्या सहकार्याने महाराष्ट्रातील पहिली “चारा बँक” सुरु असून ओपन ॲक्सेस अंतर्गत ६.५ MWP क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.

या पार्श्वभूमीवर गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., फलटण या संस्थेची स्थापना सन १९९५–९६ मध्ये झाली त्यावेळी फलटण तालुक्यात अवघे ३५ हजार लिटर प्रतिदिन दूध उत्पादन होते. त्या काळात शेतकऱ्याला ना दराची खात्री होती, ना वेळेवर पैसे मिळण्याची हमी. दुग्ध व्यवसायावर भाषणं खूप झाली, मात्र शेतकऱ्याच्या घरात आर्थिक संपन्नता कोणीच आणली नाही. तेव्हा प्रश्न असा होता, फलटणच्या शेतकऱ्याची जबाबदारी कोण घेणार ? तेव्हा पुढे आले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर. घोषणा नाही, मोर्चे नाही, आरोप-प्रत्यारोप नाही. फक्त एक निर्णय शेतकऱ्याच्या हातात थेट पैसा द्यायचा. व्यवस्था उभी करायची.

आज त्याच फलटणमध्ये गोविंद मिल्क दररोज साडेसहा ते सात लाख लिटर दूध संकलन करते. सात जिल्ह्यांतील ८०० गावांमधून २५ हजारांहून अधिक दूध उत्पादक पशुपालक या व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. ३५० बल्क मिल्क कुलर, २५० वाहने, ही साखळी कोणत्याही सरकारी फाईलमधून आलेली नाही. ती उभी राहिली आहे कारण शेतकऱ्याला विश्वास वाटला.

इथे शेतकरी मतदार नाही, तो भागीदार आहे. गुणवत्तेबाबत गोविंद मिल्कने स्पष्ट भूमिका घेतली. फक्त फॅट आणि एसएनएफ नव्हे, तर अँटीबायोटिक्स, केमिकल रेसिड्यू, अ‍ॅफलाटॉक्सिनची तपासणी केली जाते. भेसळ आढळली तर दूध नाकारलं जातं.गोविंद ने अल्पावधीत मुक्त संचार गोठा, चारा निर्मिती केंद्र, कालवड संगोपन केंद्र, अल्प किमतीत बायोगॅस संयंत्र उभारणी, महिलांसाठी विशेष मार्गदर्शनाद्वारे दुग्ध व्यवसायात त्यांना प्रशिक्षणाद्वारे प्रगतीची संधी यासारखे अनेक प्रकल्प सुरु केले असून शेतीला केवळ जोड धंदा नसून आज फलटण तालुक्यात गोविंद च्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय प्रमुख व्यवसाय म्हणून पुढे आला आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!