आपला जिल्हा
सलून दुकान मालकास लोखंडी हत्याराचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

(फलटण /प्रतिनिधी ):जिंती नाका परिसरातील एका सलून दुकानात घुसून दुकान मालकास लोखंडी हत्याराचा धाक दाखवत मारहाण करून खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास फलटण शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार श्री. आशिष अशोक गाढवे यांचे जिंती नाका, फलटण येथे “किंग युनिसेक्स पार्लर” नावाचे सलून दुकान आहे. दिनांक १९ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी इसम शाईन मोटारसायकलवरून दुकानासमोर आले. त्यापैकी एका इसमाने दुकानात घुसून शिवीगाळ करत कमरेतून धारदार लोखंडी हत्यार बाहेर काढले व “मला ओळखत नाहीस का? दुकान चालवायचे असेल तर महिन्याला १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल,” अशी धमकी दिली.
यानंतर आरोपींनी दुकानातील कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. मोहम्मद फरमान व अझीम अहमद या कामगारांना लोखंडी कड्याने मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच दुकानातील साहित्याची तोडफोड करून बाहेर उभ्या असलेल्या कारची काच फोडण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी अभिजित अरुण जाधव (वय २२, रा. मलठण, ता. फलटण, जि. सातारा) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीस २३ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.



