(जावली/ अजिंक्य आढाव)फलटण ग्रामीण व खंडाळा पोलीस ठाणे हद्दीतील गाजलेल्या फायरिंग प्रकरणातील फरार दोन अल्पवयीन संशयितांना फलटण ग्रामीण पोलिसांच्या डी.बी. पथकाने शिताफीने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्पर तपासाचे कौतुक होत आहे.
खंडाळा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०७/०५/२०२६ रोजी रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र बेकरी समोर तक्रारदार व त्याचा भाऊ यांना आरडाओरड करत असताना आरोपी असुतोष उर्फ बट्या संतोष जाधव, रा. साखरवाडी सात सर्कल, ता. फलटण, जि. सातारा व त्याच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन संशयित यांनी धक्का लागल्याच्या कारणावरून वाद घालत मारहाण केली. यावेळी एका आरोपीने पिस्तूल काढून चार राऊंड फायर केले. या गोळीबारात तक्रारदारास दोन गोळ्या लागल्या तर त्याच्यासोबत असलेल्या इसमास एक गोळी लागली. तसेच एक गोळी मिसफायर झाली होती.
या घटनेप्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०८/२०२६ बी.एन.एस. १०९, ३५२, ३(५) शस्त्र अधिनियम कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या आरोपींनी यापूर्वी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील साखरवाडी येथे एका व्यक्तीस पैसे परत न दिल्याच्या कारणावरून पिस्तूलाचा धाक दाखवत मारहाण केली होती. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १४०(१) व आर्म अॅक्ट ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील दोन अल्पवयीन संशयित फरार होते. त्यांचा शोध घेण्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी विशेष पथके तयार केली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुबनवळ यांच्या पथकासह गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्यांना खंडाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुसकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुबनवळ, पोलिस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलिस उपनिरीक्षक शिवानी नागवडे, नितीन चतुरे महादेव पिसे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, हणमंत दडस, सुरज काकडे, श्रीकांत खरात व अमोल देशमुख यांनी सहभाग घेतला.