(फलटण /प्रतिनिधी)गजानन चौकातील झाडे हटविण्याच्या प्रस्तावावरून फलटण शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, माजी नगरसेवक दादासाहेब चोरमले यांनी या प्रकरणात सविस्तर भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. “आ. श्रीमंत रामराजे आणि तत्कालीन आमदार दीपक चव्हाण यांनी शहर विकासासाठी आणलेला जवळपास २५ कोटी रुपयांचा निधी सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या नावावर खपवला,” असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून गजानन चौकातील झाडतोडीच्या जुन्या ठरावाची चर्चा शहरभर रंगत असताना, त्या ठरावामध्ये सूचक म्हणून सौ. वैशाली चोरमले यांचे नाव असल्याचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता. यावर स्पष्टीकरण देताना दादासाहेब चोरमले म्हणाले की, नगरपरिषदेचा कार्यकाळ संपत असताना मोठ्या प्रमाणात विविध विकासकामांचे ठराव मंजूर करण्यात आले होते. त्याच प्रक्रियेत गजानन चौक सुशोभीकरणाचा ठरावही मंजूर झाला असावा.
“त्या वेळचे विरोधी पक्ष नेते, गटनेते तसेच आजचे सत्ताधारी आणि सन्माननीय नगराध्यक्ष यांनाही त्या काळातील सर्व परिस्थिती माहिती आहे. मात्र जाणीवपूर्वक सौ. वैशाली चोरमले यांचे नाव त्या ठरावात सूचक म्हणून टाकण्यात आले होते, हे आम्हाला आता समजत आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
चोरमले पुढे म्हणाले, “त्या काळात जर हा ठराव अमलात आला असता, तरी आम्ही त्याला विरोधच केला असता. कारण आम्ही निसर्गावर प्रेम करणारे आणि वृक्ष संवर्धनासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणाचा ऱ्हास पाहता पर्यावरणाची हानी करून होणारा कोणताही विकास आम्हाला मान्य नाही.”
गजानन चौकातील जुनी व मोठी झाडे हटविण्याला आपण आणि सौ. वैशाली चोरमले ठाम विरोध करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आम्ही केवळ विरोधासाठी विरोध करत नाही. शहराचा विकास व्हावा ही आमची भूमिका आहे; मात्र विकास करताना पर्यावरणाचाही समतोल राखला गेला पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांवरही त्यांनी सवाल उपस्थित केले. “श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते टोपी चौक या परिसराच्या सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला होता. तत्कालीन आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रयत्नांतून जवळपास २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. काही कामांच्या टेंडर नोटिसाही निघाल्या होत्या,” अशी माहिती त्यांनी दिली.
मात्र विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर झाल्यानंतर हा निधी माघारी पाठविण्यात आल्याचा आरोप करत, “नंतर त्याच कामांची नावे बदलून आम्ही आणलेलाच निधी पुन्हा फिरवून आणण्यात आला. याबाबत सत्ताधाऱ्यांनी खुलासा करावा,” अशी मागणी त्यांनी केली.
झाडांच्या ठरावाचा उल्लेख करून राजकीय टीका करणाऱ्यांनाही चोरमले यांनी प्रत्युत्तर दिले. “जसा त्या ठरावाचा गाजावाजा केला जात आहे, तसाच आम्ही आणलेल्या निधीतून सुरू असलेल्या विकासकामांचाही गाजावाजा व्हायला हवा. आम्हाला कोणत्याही विषयाचे राजकारण करायचे नाही. शहराचा विकास आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गजानन चौकातील झाडांचा मुद्दा आता केवळ पर्यावरणापुरता मर्यादित राहिला नसून तो फलटणच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनताना दिसत आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी द्यायचा का, की पर्यावरण जपत विकास साधायचा, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.