(फलटण /प्रतिनिधी)- शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत न होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. तेली गल्ली, रंगारी महादेव मंदिर परिसर, केकाड गल्ली आणि ब्राह्मण गल्ली या भागांमध्ये मागील काही दिवसांपासून पाण्याची समस्या गंभीर बनली असून स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात फलटण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित भागांमध्ये नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दैनंदिन गरजांसाठी पाण्याची टंचाई भासत असल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
निवेदनात पुढे इशारा देण्यात आला आहे की, जर लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही, तर संबंधित नागरिकांकडून फलटण नगर परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा फलटण नगर परिषदेचे नगरसेवक विशाल यांनी दिला आहे.
या आंदोलनाच्या संभाव्य परिणामांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिक प्रतिनिधी वारिशी लिपीक यांनी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन समस्या मार्गी लावावी, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या वाढत्या असंतोषामुळे प्रशासनावर दबाव वाढत असून, आता नगर परिषद या समस्येकडे कितपत गांभीर्याने पाहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून या तक्रारीवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, परिस्थिती लक्षात घेता तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही.