(फलटण/ प्रतिनिधी )विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सर्व प्रकारच्या समतेसाठी लढा देताना मानव मुक्तीची हाक दिली.त्यांची सर्व आंदोलने सामाजिक,आर्थिक व सांस्कृतिक समतेच्या पर्यावरणाची होती त्यांनी केलेले विविध लेखन व संशोधन तसेच हिंदू कोड बील निर्मिती व संविधान निर्मिती ही समतेच्या प्रस्तावपनेची गमके होती, या सर्व अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समता हेच तत्त्व शिरोधार्य मानून सर्वतोपरी संघर्ष केला,असे प्रतिपादन प्रा.डॉ.प्रभाकर पवार यांनी कुरवली(खुर्दII.) तालुका फलटण येथे केले.
“भीम गर्जना तरुण मंडळ कुरवली (खुर्दII.)” यांनी आयोजित केलेल्या ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध जयंती’, उत्सवात प्रा.डॉ.प्रभाकर पवार “डॉ.आंबेडकर काल,आज आणि उद्या”,या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी उद्योजक निलेश व
भोसले होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सीबीआय पोलीस ऑफिसर रणजित भोसले,पोलीस पाटील नानासो शेंडगे व ॲडव्होकेट अस्मिता भोसले होत्या.वरील विषयावर बोलताना प्रा.डॉ.प्रभाकर पवार पुढे म्हणाले,, डॉ. आंबेडकर हे मानवतावादी व धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्व होते.भारत देशाच्या कल्याणासाठी व विकासासाठी त्यांनी प्रोत्साहन व अग्रक्रम दिला. समाजसुधारणा व आधुनिक विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवा म्हणून त्यांनी स्त्री-पुरुष समतेसह अनेक समतावादी आंदोलनांना जन्म दिला. महाडचा पाण्यासाठीचा सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह, अनेक परिषदा, विविध वृतपत्राचे संपादन व शेवटी बुद्ध धम्म स्वीकार हा त्याचाच एक भाग होता.त्यांच्या या मानवमुक्तीच्या लढ्याचे जगभरातून स्वागत व कौतुक झाले.आज त्यांच्या विचारांनी देश चालविणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
अध्यक्षपदावरून बोलताना उद्योजक निलेश भोसले म्हणाले महापुरुषांच्या जयंती मधून समाज प्रबोधन झाले पाहिजे समाजाने नाच गाणी व आतिषबाजीला फाटा देऊन समाजप्रबोधन व ज्ञानग्रहणासाठी ग्रंथालयांना महत्व देऊन ती उभारली तर भावी पिढी शासकीय जमात होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन आढाव यांनी केले.कार्यक्रमात ऍड.अस्मिता भोसले,पैलवान झेंडे यांचा यशस्वीतेबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार झाला. कार्यक्रमाला ‘दै.सांजवात’,चे पत्रकार अभिजीत सरगर ग्रामपंचायत सदस्य, तरुवर्ग, स्त्री-पुरुष,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी रणजीत भोसले यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.