(फलटण/ प्रतिनिधी): फलटण शहर पोलिसांनी तडीपार करण्यात आलेल्या एका सराईत इसमाला अटक करून मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत झाली असून या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ७ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अरविंद काळे हे डी.बी. पथकासह गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. तडीपार करण्यात आलेला इसम बीएसएनएल कार्यालय परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी संशयित इसमाचा शोध घेत असताना तो पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव सोनल गणेश ईगळे उर्फ ढोबळया (वय २१, रा. आखरी रस्ता, मंगळवार पेठ, फलटण) असे असून त्याच्यावर सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.
या प्रकरणी संबंधित इसमाविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे , अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी अरविंद काळे, सपोनि नितीन शिंदे, पोहेका संतोष नाळे, पोकॉ जितेंद्र टेके व पोकॉ अतुल बडे यांच्या पथकाने केली.