जावली (अजिंक्य आढाव ) – जावली येथील रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची झेप घेतली असून, दि. 05 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाकडून इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अधिकृत सहभागाची मान्यता मिळाली आहे. यासोबतच विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही शाखांना मान्यता मिळाल्याने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी शैक्षणिक संधी उपलब्ध झाली आहे.
प्रत्येक शाखेसाठी 60 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली असून, यामुळे जावली व परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज कमी होणार आहे. संस्थेच्या या यशामागे संस्थापक, संचालक मंडळ, प्राचार्य, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले.
संस्थापक अमोल चवरे यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे, आणि एकत्र काम करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे.” त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे.
या ऐतिहासिक टप्प्यामुळे जावली परिसरात आनंदाचे वातावरण असून, विद्यार्थी व पालकांकडून संस्थेचे अभिनंदन केले जात आहे. भविष्यातही संस्थेकडून शैक्षणिक क्षेत्रात नवे उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.