क्राईम न्युज

फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; २ गावठी पिस्तुले व जिवंत काडतुसे जप्त,४ जण जेरबंद

(जावली /अजिंक्य आढाव )फलटण ग्रामीण पोलिसांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत दोन गावठी पिस्तुले, जिवंत काडतुसे, मोटारसायकल व मोबाईल असा सुमारे २ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून शस्त्रांची विक्री व खरेदी करणाऱ्या साखळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दुधेबावी परिसरातील प्रतीक प्रमोद खुंटे (रा. मांडवे, ता. पुरंदर जि. पुणे) याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून संशयितांचा पाठलाग केला. फलटण-दहिवडी मार्गावर कारवाई करत प्रतीक खुंटे व प्रदीप उर्फ सोन्या संतोष गोरे (रा.साखरवाडी, ता. फलटण) याला ताब्यात घेण्यात आले.

झडतीदरम्यान प्रतीक खुंटे याच्याकडून एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. अधिक चौकशीत त्याने आणखी एक गावठी पिस्तूल करण कानिफ घोलप (रा. मंगळवार पेठ, फलटण) याला विकल्याची माहिती दिली. त्यानंतर करण घोलप व त्याचा सहकारी समीर उर्फ वर्धन बाळासो खवळे (रा. मांडवखडक, ता. फलटण) यांनाही ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत पोलिसांनी २ गावठी पिस्तुले, २ जिवंत काडतुसे, १ प्लसर मोटारसायकल व ३ मोबाईल फोन असा एकूण २,५०,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर आरोपींविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या इतर संशयितांचाही शोध घेतला जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. कारवाईत श्री. दीपक पवार, नितीन चव्हाण, अमोल जगताप, श्रीनाथ कदम, हनुमंत दडस, गणेश यादव, विक्रम बनकर, तुषार नलवडे सुरज काकडे व अमोल देशमुख यांनी सहभाग घेतला

Related Articles

Back to top button
Don`t copy text!