(जावली /अजिंक्य आढाव )दि. ३० एप्रिल – फलटण ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू व्यवसायाविरोधात सुरू केलेल्या मोहिमेत मोठी कारवाई करत गावठी हातभट्टी दारू गाळण्याच्या अड्ड्यावर छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमे अंतर्गत मोजे सस्तेवाडी (ता. फलटण) परिसरात गावठी हातभट्टी दारू गाळली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत सुवर्णलावळ व त्यांच्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. कारवाईदरम्यान सुमारे ९६० लिटर रसायन (वॉश), दोन लोखंडी कढई व जळण असा एकूण १ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी संजय श्याम पवार व अर्जुन श्याम पवार, रा. सोमवार पेठ, ता. फलटण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
फलटण ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले असून, अशा प्रकारच्या अवैध धंद्यांबाबत नागरिकांनी गोपनीय माहिती दिल्यास त्यांचे नाव गोपनीय ठेवून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत सुवर्णलावळ, पोलिस उपनिरीक्षक अमोल जगदाळे, पोलिस कर्मचारी नितीन चव्हाण, हणमंत दडस, तुषार नलवडे आदींनी सहभाग घेतला.