(फलटण /प्रतिनिधी) सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असताना काही चर्चित नावांनी राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले आहे. मात्र या नावांच्या चर्चेबरोबरच एक महत्त्वाचा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे – या निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळणार का.?
सध्या चर्चेत असलेल्या नावांमध्ये मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे व्याही पृथ्वीराज देशमुख, खासदार महाडिक यांचे बंधू सम्राट महाडिक, माजी मंत्री शशिकांत शिंदे तसेच माजी मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
या सर्व नावांकडे पाहिल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की बहुतांश उमेदवार हे आधीपासून राजकीय प्रभाव असलेल्या कुटुंबांशी संबंधित आहेत. त्यामुळे “राजकारणात संधी ही कार्यकर्त्यांना मिळणार की केवळ घराण्यांनाच?” असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला समान संधी मिळणे अपेक्षित असते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ते गेली अनेक वर्षे जनतेच्या प्रश्नांसाठी काम करत आहेत. अनेकांनी पक्षासाठी संघर्ष केला, निवडणुकांमध्ये रात्रंदिवस मेहनत घेतली, संघटना मजबूत केली. मात्र उमेदवारीची वेळ आली की पुन्हा त्याच राजकीय घराण्यांतील व्यक्तींनाच संधी मिळत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत आहे.
राजकीय घराण्यांतील व्यक्तींना उमेदवारी देण्यामागे त्यांच्या समर्थकांचेही काही मुद्दे आहेत. त्यांचा दावा असतो की अशा उमेदवारांकडे राजकीय अनुभव, जनसंपर्क, संघटनात्मक ताकद आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता असते. त्यामुळे पक्ष विजयाच्या दृष्टीने त्यांच्यावर विश्वास दाखवतात. परंतु याचवेळी नवीन नेतृत्व घडविणे, सामान्य कार्यकर्त्यांना पुढे आणणे आणि लोकशाहीचा विस्तार करणे हीसुद्धा राजकीय पक्षांची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त होत आहे.
सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये अनेक सक्षम, अभ्यासू आणि जनाधार असलेले कार्यकर्ते आहेत. सहकार, शिक्षण, शेती, सामाजिक क्षेत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उल्लेखनीय काम करणारे अनेक चेहरे आजही संधीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना राजकीय वारसा नसला तरी जनतेशी असलेली नाळ आणि कामाचा अनुभव मोठा आहे. अशा व्यक्तींना संधी मिळाली तर राजकारणात नव्या विचारांचे आणि नव्या नेतृत्वाचे स्वागत होऊ शकते.
सामान्य नागरिकांच्या चर्चेतून आणखी एक मुद्दा पुढे येत आहे. जर मंत्री, खासदार, माजी मंत्री किंवा प्रभावशाली नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच सातत्याने संधी मिळत राहिली, तर सामान्य कार्यकर्त्यांनी राजकारणात येण्याची प्रेरणा कुठून घ्यायची? मेहनत, निष्ठा आणि कार्यकर्तेपण यांना महत्त्व राहणार की केवळ राजकीय वारसालाच प्राधान्य दिले जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
निश्चितच प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढविण्याचा आणि लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र उमेदवारी देताना पक्षांनी केवळ आडनाव, नातेसंबंध किंवा राजकीय वारसा न पाहता जनाधार, कामगिरी आणि नेतृत्व क्षमता यांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर कोणाला उमेदवारी मिळणार हे येणारा काळच ठरवेल. मात्र या निवडणुकीने एक मोठी चर्चा सुरू केली आहे – लोकशाहीत सर्वसामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने संधी मिळणार का, की पुन्हा एकदा राजकीय घराणेशाहीच वरचढ ठरणार?
याचे उत्तर पक्षश्रेष्ठींच्या निर्णयातून मिळेल; पण जनतेच्या मनातील हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे.