आपला जिल्हा

गुणवरे येथील आढावस्तीची एकी, माणुसकी आणि प्रेमाचा अविस्मरणीय सोहळा

(जावली/ अजिंक्य आढाव )दि. १ जून : गुणवरे येथील आढावस्तीवर पंचशील तरुण मंडळाच्या वतीने आयोजित सार्वजनिक वाढदिवस सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात वस्तीतील ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच मुंबई पोलीस दलात नियुक्ती झालेल्या कन्येचा आणि तिच्या आई-वडिलांचा विशेष सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित करताना तरुण पिढीने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेले. वस्तीच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ज्येष्ठांचा गौरव हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला.

यावेळी मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या युवतीचा तसेच तिच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. तिच्या यशामुळे संपूर्ण वस्तीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आजच्या धकाधकीच्या जीवनात सामाजिक एकोपा आणि परस्पर स्नेह जपणाऱ्या या कार्यक्रमाने आढावस्तीतील एकीचे दर्शन घडवले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करत असल्याने कार्यक्रमाला कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले होते.

या उपक्रमातून तरुण पिढीला ज्येष्ठांचा आदर, समाजातील एकात्मता आणि यशस्वी व्यक्तींचा गौरव करण्याचा सकारात्मक संदेश मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!