आपला जिल्हा

चार दशकांच्या शैक्षणिक सेवेनंतर विठ्ठल निकाळजे सेवानिवृत्त ; भावनिक निरोप समारंभ

"विद्यार्थ्यांच्या घडणीत आयुष्य वेचणाऱ्या विठ्ठल निकाळजे यांना भावपूर्ण निरोप"

(सोमिनाथ घोरपडे  /प्रतिनिधी)शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कार्यतत्परतेने सेवा बजावणारे ज्येष्ठ शिक्षक विठ्ठल बाबुराव निकाळजे यांनी सेवानिवृत्ती स्वीकारत आपल्या शैक्षणिक सेवेला भावपूर्ण विराम दिला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेला त्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी निकाळजे सरांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रियता, नेतृत्वगुण आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या तळमळीचा विशेष उल्लेख केला. विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि समाजाभिमुख शिक्षक म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

सेवानिवृत्तीनिमित्त मनोगत व्यक्त करताना निकाळजे सर म्हणाले की, संघर्षमय परिस्थितीतून पुढे येत त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला. रयत शिक्षण संस्थेच्या विचारधारेतून प्रेरणा घेत विविध शाळांमध्ये प्रामाणिकपणे सेवा बजावत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले. आज अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडी येथे कार्यरत असताना शाळेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. कमिन्स इंडिया कंपनीच्या सहकार्याने वॉल कंपाऊंड, संगणक कक्ष, रंगरंगोटी, इंटरॲक्टिव्ह डिस्प्ले बोर्ड तसेच माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने बोरवेल आणि सुलभ शौचालय युनिट उभारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या विकासकामांसाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दत्तात्रेय (तात्या) चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी शिक्षक सहकाऱ्यांच्या वतीने विठ्ठल निकाळजे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच भारतीय बौद्ध महासभा परिवाराच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही त्यांचा सत्कार करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

“सेवानिवृत्ती हा सेवाकाळाचा शेवट नसून समाजसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे,” अशी भावना अनेक वक्त्यांनी व्यक्त केली. भावनिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनावर कायमस्वरूपी छाप पाडली.

कार्यक्रमास दत्तात्रेय (तात्या) चव्हाण, प्रशांत शिंदे, गोरख शिंदे, सुप्रियाताई अहिरेकर, चंद्रकांत भोईटे, लता भोईटे, ज्ञानेश्वर वाघ, राजेंद्र राजपुरे, जितेंद्र चव्हाण, सचिन अहिरेकर, किशोर शिंदे, सोमीनाथ घोरपडे, बाबासाहेब जगताप, रामचंद्र मोरे, आनंद जगताप, विजय निकाळजे, अजय निकाळजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!