ताज्या घडामोडी
मुंबईत सिंक रॉक जलतरणाचा महासंग्राम ! गेटवे ऑफ इंडिया येथे रविवारी ऐतिहासिक ६२ वी स्पर्धा उद्घाटन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते

मुंबई (क्री. प्र.) : अथांग अरबी समुद्राच्या निळ्याशार लाटांवर जिद्द, साहस आणि वेगाचा थरार अनुभवण्याची सुवर्णसंधी पुन्हा एकदा मुंबईकरांना मिळणार आहे. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ६२ व्या ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ स्पर्धेचा जल्लोष रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया परिसरात रंगणार आहे.
समुद्राच्या लाटांशी दोन हात करत आपले सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रभरातील शेकडो जलतरणपटू सज्ज झाले असून, या महास्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मा. रितू तावडे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे स्पर्धेला विशेष औचित्य प्राप्त झाले आहे.
सागरी जलतरणाचा ऐतिहासिक वारसा
महाराष्ट्र स्टेट आमटेर अकॅटिक अससोसिएशन (MSAAA) यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेला सहा दशकांची समृद्ध परंपरा लाभली आहे. अध्यक्ष आनंद माने आणि सरचिटणीस राजेंद्र पालकर यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे.
खेळाडूंनी सकाळी ७:३० वाजता रिपोर्टिंग करणे बंधनकारक
सकाळी ९:०० वाजता बोटीने प्रस्थान
प्रत्यक्ष शर्यतींची सुरुवात १०:३० ते ११:३० दरम्यान
समुद्रातील आव्हानात्मक परिस्थिती लक्षात घेऊन सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
तीन अंतरांचा थरार ; विविध वयोगटांसाठी संधी
या महास्पर्धेत १ किमी, २ किमी आणि ५ किमी अशा तीन अंतरांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत.१ किमी – ८–९ वर्षे वयोगटातील बालजलतरणपटू व दिव्यांग खेळाडू (खुला गट)
२ किमी – १०–११, १२–१३ आणि ४६–५५ वर्षे वयोगट५ किमी – १४–१५, १६–२५ आणि २६–४५ वर्षे वयोगटातील पुरुष व महिला
अनुभव, वेग आणि सहनशक्ती यांचा संगम पाहायला मिळणार असून समुद्रातील प्रत्येक स्ट्रोक साहसाची कहाणी सांगणार आहे.
विजेत्यांसाठी बक्षिसांचा वर्षाव
प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख पारितोषिके, गुणवत्ता ई-प्रमाणपत्र, आकर्षक भेटवस्तू आणि पदके देऊन गौरविण्यात येणार आहे.
याशिवाय, १ किमी, २ किमी आणि ५ किमी अंतरातील सर्वात वेगवान पुरुष व महिला जलतरणपटूंना प्रतिष्ठेची ‘फास्टेस्ट स्विमर ट्रॉफी’ आणि ‘रोलिंग ट्रॉफी’ प्रदान केली जाणार आहे. ही ट्रॉफी जिंकणे म्हणजे जलतरणपटूंसाठी सर्वोच्च सन्मान मानला जातो.
सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
सर्व सहभागींसाठी विशेष वैद्यकीय पथके, प्रशिक्षित बचाव कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. समुद्रातील अनिश्चित परिस्थिती लक्षात घेता आयोजकांनी अत्यंत दक्षता घेतली असून खेळाडूंना सुरक्षित वातावरणात स्पर्धा करता येईल याची खात्री करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या जलतरण कौशल्याचा महासोहळा ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून महाराष्ट्राच्या जलतरण परंपरेचा अभिमान आहे. नवोदित जलतरणपटूंना प्रेरणा देणारा आणि अनुभवी खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर छाप उमटवण्याची संधी देणारा हा भव्य क्रीडा महोत्सव ठरणार आहे.
सरचिटणीस राजेंद्र पालकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “या भव्य स्पर्धेला उपस्थित राहून जलतरणपटूंचा उत्साह वाढवा आणि त्यांच्या धाडसी प्रयत्नांना दाद द्या.”



