ताज्या घडामोडी

जयंवत चुनेकर प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कार मधुरा राजवंशी यांना जाहीर

(मुंबई/ प्रतिनिधी )मराठी भाषा संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या मराठी अभ्यास केंद्रातर्फे शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मधुरा राजवंशी यांना ‘जयंवत चुनेकर प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

मराठी अभ्यास केंद्र ही विविध उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषा व संस्कृती संवर्धनाचे कार्य करणारी स्वयंसेवी संस्था असून, मराठीसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी विविध पुरस्कार प्रदान केले जातात. यामध्ये मराठी चळवळीचे अभ्यासक अॅड. शांताराम दातार आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी कवी रविंद्र सुर्वे मराठी भाषा आग्रही पुरस्कार, जयंवत चुनेकर प्रयोगशील शिक्षक पुरस्कार, तसेच पत्रकारितेतील कार्यासाठी दिन रणदिवे मराठीसेवा माध्यमकर्मी पुरस्कार आणि दिवंगत अशोक नाना चुरी यांच्या स्मरणार्थ आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारांचा समावेश आहे.

मधुरा राजवंशी यांनी कमला निंबकर बालभवन, फलटण येथे राबविलेल्या विविध प्रयोगशील शैक्षणिक उपक्रमांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम आणि मराठी भाषेच्या जतनासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्थेने विशेष गौरव व्यक्त केला आहे.
पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. 1 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शाहू सभागृह, तिसरा मजला, श्री शिवाजी मंदिर, दादर (प.), मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार आणि सचिव आनंद भंडारे यांनी पत्राद्वारे ही घोषणा केली असून, मराठी भाषा व संस्कृतीच्या जतनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून समाजापुढे आदर्श उभा करण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!