ताज्या घडामोडी

सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यात प्रथम ; राजनंदिनी पडरचा सीईओंच्या हस्ते गौरव

(जावली /अजिंक्य आढाव ): जावली येथील कु. राजनंदिनी विठ्ठल पडर हिने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला. या उल्लेखनीय यशाबद्दल कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. राजनंदिनीने आपल्या प्रभावी वक्तृत्व आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवत आपली प्रतिभा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

राजनंदिनी लहानपणापासूनच वक्तृत्वाची विशेष आवड जोपासत आहे. इयत्ता पहिलीत प्रवेश करण्यापूर्वीपासूनच विविध कार्यक्रमांत ती आत्मविश्वासाने मनोगत व्यक्त करत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तिच्या वक्तृत्वाचे विशेष कौतुक केले होते.

तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत तिने अनेकदा प्रभावी भाषणे देत उपस्थितांची मने जिंकली आहेत. त्यामुळे ती त्यांच्या कार्यक्रमांतील ‘स्टार प्रचारक’ म्हणून राज्यभर परिचित झाली आहे. विविध प्रमुख वृत्तपत्रांनीही तिच्या वक्तृत्वाची दखल घेतली आहे.

राज्यभरातील अनेक शासकीय व खाजगी वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग घेत तिने बारामती, सांगोला आणि सांगली येथील खुल्या गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय ती उत्तम कथाकथनकार म्हणूनही कार्यरत आहे. मुर्टी (ता. बारामती) येथील अक्षर मानव साहित्य संमेलन, येळेवाडी (ता. माण) येथील ग्रामीण मराठी साहित्य संमेलन तसेच सांगली येथील साहित्य संमेलनात तिने प्रभावी कथाकथन सादर केले आहे. प्रसिद्ध कथाकथनकार रवींद्र कोकरे यांनी तिला कथाकथनासाठी प्रेरणा दिली आहे.

या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राजनंदिनीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!