आपला जिल्हा

बरड–मिरढे रोडचा ‘खड्डा कारभार’ उघड ! बिलासाठी रखडले काम.!

PWD अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष..?

(जावली / अजिंक्य आढाव)फलटण तालुक्यातील बरड–मिरढे रस्ता सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. लाखो रुपयांचा खर्च करून करण्यात आलेले डांबरीकरण काही दिवसांतच उखडून गेले असून ठिकठिकाणी डांबर गायब झाले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत आणि अपघाताचा धोका वाढला आहे.

स्थानिकांच्या आरोपानुसार, कामाचे बिल प्रलंबित असल्याने ठेकेदाराने कामात दिरंगाई केली. परिणामी अर्धवट काम, निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण आणि सततची रखडपट्टी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. “रस्ता करतात की थट्टा ?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

या प्रकरणात (PWD) अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

हा मार्ग फलटण–शिंगणापूर रोडला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. शिखर शिंगणापूर, म्हसवड आणि माण तालुक्यातील हजारो नागरिकांची दररोजची ये-जा याच रस्त्यावरून होते. शाळकरी मुले, शेतकरी, व्यापारी आणि रुग्णवाहिका यांच्यासाठी हा मार्ग जीवनवाहिनी ठरतो. मात्र सध्याची दयनीय अवस्था पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे उलटली, तरी या रस्त्याचा वनवास संपत नसल्याची तीव्र खंत व्यक्त होत आहे. टप्प्याटप्प्याने सुरू असलेले काम, वारंवार होणारी दिरंगाई आणि अधिकाऱ्यांची कथित निष्काळजीपणा यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्रशासनाने तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी व दर्जेदार काम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. “खड्ड्यांचा हा खेळ थांबवा, आमचा जीव वाचवा!” अशी आर्त मागणी आता सर्वसामान्यांतून होत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!