(फलटण/ प्रतिनिधी) -“आई-वडील आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार, त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद हीच विद्यार्थ्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. त्या शिकवणीनुसार आचरण केले, तर कोणतेही ध्येय अशक्य राहत नाही,” असे प्रेरणादायी प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा सुप्रसिद्ध वक्ते सचिन मोरे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री जितोबा विद्यालय, जिंती (ता. फलटण) येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा व निरोप समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला शिक्षक, पालक व ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती.
आपल्या भाषणात मोरे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी माता जिजाऊ आणि गुरुजनांच्या संस्कारातून स्वराज्याचे स्वप्न साकार केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून भारताची राज्यघटना निर्माण केली. त्यांच्या जीवनातील संघर्ष, जिद्द आणि चिकाटी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत.
तसेच संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “आई-वडील आपल्या शिक्षणासाठी कष्ट उपसतात, प्रसंगी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतात. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवा,” असा सल्लाही त्यांनी दिला.
दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी विविध शहरांकडे वाटचाल करताना शाळेचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि गावाशी असलेले नाते कधीही विसरू नका, असे भावनिक आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी निवृत्त उपप्राचार्य महादेव गुंजवटे, अध्यक्ष राजेंद्र रणवरे, पी. एन. रणवरे, एम. एन. रणवरे, जगदेवराव रणवरे, पत्रकार यशवंत खलाटे पाटील, नवल रणवरे, मुख्याध्यापिका सौ. जाधव एम. डी., ज्येष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक ताराचंद्र आवळे यांनी केले, सूत्रसंचालन जिया तांबोळी हिने केले तर आभार प्रदर्शन सार्थक रणवरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले असून स्मृतिचिन्ह म्हणून शाळेला दोन खुर्च्यांची भेट देत कृतज्ञता व्यक्त केली.