आपला जिल्हा

मुधोजी महाविद्यालयात ‘आई माझ्या कॉलेजात’ उपक्रम उत्साहात

फलटण (प्रतिनिधी) : येथील मुधोजी महाविद्यालय येथे ‘आई माझ्या कॉलेजात’ या आगळावेगळ्या व नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. माजी विद्यार्थी समिती आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात माजी विद्यार्थी मेळावा तसेच माता-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला माता-पालक आणि माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ॲड. अभिजीत मोहिते तसेच स्नेहा गवळी (फॉरेस्ट अधिकारी) उपस्थित होते. आपल्या मनोगतात स्नेहा गवळी यांनी आपल्या यशस्वी जीवनप्रवासाचा आढावा घेत एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षांसाठी केलेला अभ्यास, त्यामागील संघर्ष आणि त्याग याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या यशामध्ये आई-वडिलांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी विशेष नमूद करत विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांचे महत्त्व पटवून दिले.

ॲड. अभिजीत मोहिते यांनी ‘आई माझ्या कॉलेजात’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद निर्माण होईल तसेच मातांना सन्मान दिल्याने त्यांच्या मनात अभिमानाची भावना दृढ होईल, असे ते म्हणाले. युवकांनी आपल्या आईसाठी काहीतरी मोठे करण्याची प्रेरणा घेऊन सन्माननीय मार्गाने पुढे जावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींनाही उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि शिक्षण प्रक्रिया अधिक परिणामकारक व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांबरोबरच पालकांचाही महत्त्वाचा सहभाग असतो. विशेषतः आई ही जणू ईश्वराचे दुसरे रूपच असून तिच्या त्यागाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला शाखाप्रमुख डॉ. अशोक शिंदे यांनी केले. माता-पालक प्रतिनिधी म्हणून सौ. साधना कदम यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच आजी-माजी विद्यार्थी आणि पालकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे आभार माजी विद्यार्थी समितीचे चेअरमन डॉ. नवनाथ रासकर यांनी मानले. सूत्रसंचालन बीएससी भाग तीनच्या धनश्री जगताप, वैष्णवी पवार व पायल जाधव या विद्यार्थिनींनी केले. चहापान व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!