फलटण (प्रतिनिधी): भारतीय बौद्ध महासभामध्ये निलंबनाच्या निर्णयावरून मोठा स्फोट झाला असून फलटण तालुका कार्यकारिणीने सामूहिक राजीनामा देत जिल्हा नेतृत्वाला थेट आव्हान दिले आहे. आयु. महावीर भालेराव यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ घेतलेल्या या निर्णयामुळे सातारा जिल्हा पूर्व शाखेत राजकीय व संघटनात्मक वादळ उठले आहे.
जिल्हा पूर्व अध्यक्ष आयु. नानासो मोहिते यांच्या कारभारावर “मनमानी आणि एकतर्फी निर्णय” घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. भालेराव यांना कोणतीही पूर्वसूचना न देता थेट निलंबित करण्यात आले, त्यांची बाजू ऐकून घेण्याची संधीही देण्यात आली नाही, असा संताप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, भालेराव यांनी यापूर्वीच दिलगिरी व्यक्त करून भविष्यात अशा घटना टाळण्याची भूमिका स्पष्ट केली होती, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी आणि महासभा यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळेच गैरसमज निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अधिकृत बैठक घेणे अपेक्षित असताना थेट कारवाई करण्यात आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पिंपरद (ता. फलटण) येथे जिल्हा पूर्व अध्यक्षांच्या उपस्थितीत ग्राम शाखा स्थापन झाली. त्या शाखेतील काही पदाधिकाऱ्यांनी उघडपणे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने “दुहेरी निकष” लावले जात असल्याची जोरदार टीका करण्यात आली आहे.
१२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या आभासी बैठकीत बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी भालेराव यांना प्रत्यक्ष समज देण्याचा पर्याय सुचवला होता. मात्र त्या मतांकडे दुर्लक्ष करून जिल्हाध्यक्षांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. वरिष्ठ पातळीवर चुकीची माहिती देऊन निलंबनाची कारवाई रेटून नेल्याचेही कार्यकारिणीचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर फलटण तालुका कार्यकारिणीने एकमुखी निर्णय घेत आपापल्या पदांचा राजीनामा जाहीर केला. सरचिटणीस, कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संघटक यांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी जबाबदाऱ्या सोडत नेतृत्वावर अविश्वास दर्शवला आहे.
“धम्मकार्याला वेळ देणारे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व हवे,” अशी मागणी करत राज्य व केंद्रीय पातळीवर तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सातारा जिल्हा पूर्वमधील धार्मिक व सामाजिक कामकाज ठप्प होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या घडामोडींमुळे संघटनेत प्रचंड खळबळ उडाली असून पुढील निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.