फलटण (प्रतिनिधी): निंबळक (ता. फलटण) येथील प्राचीन निमजाई देवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी हात साफ करत देवीचा सुमारे ३० हजार रुपये किंमतीचा चांदीचा मुकुट लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.सकाळी मंदिराचे पुजारी पुरुषोत्तम गुरव हे मंदिर उघडण्यासाठी आले असता देवीच्या मूर्तीवरील मुकुट गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मंदिरातील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आल्याने चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
फलटण ग्रामीण पोलिस ठाणे येथील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बरड पोलीस दूरक्षेत्राचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनवळ यांनी कर्मचारी सागर अभंग, श्री. शिंदे यांच्यासह डॉग स्कॉड व फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या मदतीने सखोल पंचनामा केला. गावातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून संशयितांचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही या मंदिरात चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “देवस्थानाची सुरक्षा वाढवावी, रात्री गस्त वाढवावी आणि सीसीटीव्ही व्यवस्था सक्षम करावी,” अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
दरम्यान, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनवळ करीत आहेत. पोलिसांकडून लवकरच आरोपींचा छडा लावला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.