(जावली /अजिंक्य आढाव) : प्रत्येकाने आपल्या वया इतकी झाडे लावली पाहिजेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ४० देवराया उभ्या राहिल्या असून १०० देवराया उभारण्याचा आमचा संकल्प असून झाडांसाठी पैसा कधी कमी पडत नाही, लोकच या कामासाठी पुढाकार घेतात याची ग्वाही देत अमोल मुळीक यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी पुढे येऊन पर्यावरण संवर्धनाची चळवळ उभारली पाहिजे अशी अपेक्षा अभिनेते तथा सह्याद्री देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
सासकल, ता. फलटण येथे भगवान मुळीक व अमोल मुळीक यांच्या शेतात आणि बांधावर १३०० जंगली व फळझाडांची लागवड करण्यात आली. काव्या ॲडव्हेंचर प्रा. लि., मुंबई, सह्याद्री देवराई, सातारा, कृषी विभाग, वन विभाग आणि योद्धा अकॅडमी, फलटण यांच्या संयुक्त सहभागाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सासकल येथे वृक्षारोपण व संवर्धनाच्या उपक्रमाचा शुभारंभ सयाजी शिंदे यांच्या हस्ते झाडे लावून करण्यात आला, यावेळी उपवन संरक्षक सातारा अमोल सातपुते (भा.व.से.), प्रसिद्ध अस्थिविकार तज्ञ तथा अस्थिशल्य चिकित्सक डॉ. प्रसाद जोशी, सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग प्रदीप सुर्वे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, वनक्षेत्रपाल मारुती निकम, सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल विजय रामटेके, मंडळ कृषी अधिकारी अशोक जगदाळे, उप कृषी अधिकारी अजित सोनवलकर, कृषी सेवा रत्न सचिन जाधव, कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी बबन मुळीक तसेच पंचक्रोशीतील शेती विषयाचे अभ्यासक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माणसाला पैसा वाढवण्याचा रोग जडला असल्याने शेती, गाड्या आणि संपत्ती वाढविण्याच्या नादात पर्यावरणाकडे त्याचे दुर्लक्ष होत आहे. मंत्री – पुढाऱ्यांचा नव्हे, तर झाडे लावणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि वृक्षसंवर्धनासाठी झटणाऱ्या अधिकाऱ्यांचा आदर्श समाजाने घ्यावा असे आवाहन अभिनेते तथा सह्याद्री देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांनी केले.आज लाखो – कोट्यवधी रुपयांच्या गाड्या घेतल्या जातात, मात्र झाडे लावण्याकडे दुर्लक्ष केले जाते. गाड्या काही वर्षांत निकामी होतात, पण झाडे १०० – २०० वर्षे मानवजातीला साथ देत असल्याचे निदर्शनास आणून देत वृक्षारोपण आणि संवर्धन हीच खरी भविष्यातील उपयुक्त गुंतवणूक असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.
फलटण परिसरातील वृक्षसंवर्धनाच्या कामाचे कौतुक करताना त्यांनी डॉ. प्रसाद जोशी यांच्या उपक्रमांचा विशेष उल्लेख केला. सातारा जिल्ह्यात ४-५ आदर्श देवराया उभ्या राहतील, त्यासाठी फलटणकरांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतानाच सासकल येथे उभ्या रहात असलेल्या देवराईसाठी आपण दरवर्षी येथे येणार आहोत, या परिसरातील डोंगर कपारींमध्ये वनराईच्या माध्यमातून पंचवटी निर्माण करण्याचा संकल्प असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले, पृथ्वी वाचवायची असेल तर मुळांचे कुळ स्वीकारावे लागेल, देवळे वाढत नाहीत, मात्र त्यांच्या आसपासची झाडे सतत वाढत असतात. पर्यावरण आणि पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय दुसरा पर्याय नाही.वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी अधिक व्यापक प्रयत्न होणे अपेक्षित असताना शासन हा विषय पुरेशा गांभीर्याने घेत नसल्याची खंत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी देवराई संवर्धनाचे महत्त्व विशद केले, तर डॉ. प्रसाद जोशी यांनी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगितले.
कृषी सेवा रत्न सचिन जाधव यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सर्वांच्या सहकार्याने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला असून याला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रारंभीच स्पष्ट केले.भगवान मुळीक व अमोल मुळीक या पिता-पुत्र शेतकऱ्यांच्या पुढाकारामुळे सासकल परिसरात पर्यावरण संवर्धनाची नवी चळवळ उभी राहत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.