आपला जिल्हाताज्या घडामोडी

साधेपणा, धम्म आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश : कालकथित किसाबाई जगन्नाथ कांबळे यांच्या प्रथम स्मृतिदिन

(फलटण /प्रतिनिधी) : कालकथित किसाबाई जगन्नाथ कांबळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम धम्ममय वातावरणात संपन्न झाला. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा, कर्मकांड किंवा जुन्या अवैज्ञानिक चालीरीतींना थारा न देता बौद्ध धम्माच्या विचार व संस्कार पद्धतीनुसार हा कार्यक्रम पार पडला. भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव यांनी विधी संपन्न केला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयु. महावीर भालेराव म्हणाले की, बौद्ध धम्म हा नीतिमान, निर्मळ व विवेकपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग आहे. आपल्या पूर्वजांच्या, आप्तेष्टांच्या व कुटुंबीयांच्या स्मृती जतन करण्यासाठी स्मृतिस्थळे निर्माण व्हावीत. त्याचबरोबर त्या परिसरात पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या वृक्षांचे, विशेषतः बोधीवृक्षाचे रोपण करून गेलेल्या व्यक्तींच्या आठवणी जपल्या पाहिजेत.

ते पुढे म्हणाले की, “मनुष्य आपल्या कुशल कर्मांमुळेच समाजात स्मरणात राहतो. त्यामुळे प्रत्येकाने बौद्ध धम्माच्या आचरणासह पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”त्यांनी कालकथित किसाबाई यांच्या कष्टमय जीवनावर प्रकाश टाकत, त्यांनी अपार कष्टातून आपल्या नऊ मुलांचा सांभाळ केला असल्याचे सांगितले. तसेच माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर माता रमाई यांच्या त्यागमय जीवनाची आणि किसाबाई यांच्या संघर्षमय जीवनाची तुलना करत दोघींच्या कष्टमय जीवनातील साम्य अधोरेखित केले.

यावेळी लोकप्रसिद्ध शाहीर महावीर शिंदे यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. त्यांनी कालकथित किसाबाई यांच्या कष्टमय जीवनावर गीतांच्या माध्यमातून प्रकाश टाकला.कालकथित किसाबाई यांची बुद्धांच्या विचारांवर नितांत श्रद्धा होती. त्यांची एकदा तरी बुद्धगया येथे जाण्याची इच्छा होती. त्यांची ही इच्छा त्यांचे सुपुत्र राहुल कांबळे यांनी सन २००६ मध्ये पूर्ण केली. बुद्धांच्या विचारांवर चालणारे त्यांचे जीवन समाजासाठी प्रेरणादायी आहे.”यावेळी अनेक मान्यवरांनी कालकथित किसाबाई जगन्नाथ कांबळे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आयु.बाबुराव जगन्नाथ कांबळे प्रल्हाद जगन्नाथ कांबळे कैलास जगन्नाथ कांबळे राहुल जगन्नाथ कांबळे राजेंद्र जगन्नाथ कांबळे संजय जगन्नाथ कांबळे विजय जगन्नाथ कांबळे लक्ष्मी बबन सोनवणे शीला विजय सोनवणे, बौद्ध उपासक-उपासिका, भारतीय बौद्ध महासभेचे आजी-माजी पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!