(जावली /अजिंक्य आढाव )अलीकडील काळात फलटण शहर व तालुक्यातील विविध गुन्ह्यांवर पोलिसांनी केलेल्या धडक कारवायांमुळे पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसत आहे. गांजा तस्करी, अवैध वाहतूक, सोशल मीडियावरील गुन्हे तसेच विविध बेकायदेशीर प्रकारांवर सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये काही प्रमाणात धाक निर्माण झाला आहे.
मात्र, ग्रामीण भागात वाढत्या घरफोड्या, शेतमाल चोरी, जनावरांची चोरी तसेच सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत नागरिकांमध्ये अद्यापही चिंता कायम आहे. अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी चोरीच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी शहरापुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातही गस्त वाढवून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
स्थानिक गुन्हे शाखा आणि फलटण पोलिसांनी अलीकडे केलेल्या कारवायांमुळे गुन्हेगारीविरोधात सकारात्मक संदेश गेला असला, तरी या कारवायांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी होणे तितकेच महत्त्वाचे आहे. अवैध व्यवसाय, मटका, जुगार, अमली पदार्थांची विक्री आणि चोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून आणखी ठोस पावले उचलली जातील का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
फलटण पोलिसांची सध्याची आक्रमक भूमिका कायम राहिल्यास गुन्हेगारांवर निश्चितच वचक निर्माण होईल आणि कायद्याची भीती वाढेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. ग्रामीण भागातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालून नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांन समोर आहे.