(फलटण/प्रतिनिधी):सोशल मीडियाचा गैरवापर करून एका महिलेची बदनामी करणाऱ्या दोघांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून महिलेचे मॉर्फ केलेले फोटो, व्हिडिओ आणि आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या तक्रारीनंतर फलटण शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपींनी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर सिमकार्ड मिळवून बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केल्याचे निष्पन्न झाले.
या खात्याच्या माध्यमातून महिलेचे मॉर्फ केलेले फोटो तसेच आक्षेपार्ह संदेश फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर प्रसारित करून तिची व तिच्या पतीची बदनामी करण्यात येत होती. तांत्रिक तपास आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी प्रमोद सनद कांबळे (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, फलटण) आणि सुनील बाळू मोहिते (वय ३४, रा. वाठार निंबाळकर, ता. फलटण) यांना ताब्यात घेतले.
तपासात सुनील मोहिते हा एका टेलिकॉम कंपनीचा सिमकार्ड विक्रेता असून त्याने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर सिमकार्ड उपलब्ध करून दिल्याचे उघड झाले. या प्रकरणात पोलिसांनी ४ मोबाईल हँडसेट, ६ सिमकार्ड आणि सुमारे २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे व त्यांच्या पथकाने केली. सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांनी सतर्क राहावे आणि अशा प्रकारची घटना घडल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.