सातारा, दि. ७ : महसूल विभागाच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यांपासून मंडळ स्तरावर सुरू असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आता हे अभियान नागरी भागातही राबविण्यात येणार आहे. उद्या दि. ८ मे रोजी सातारा जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालयांसह नागरी भागांमध्ये एकूण १३ ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
वाई येथे होणाऱ्या शिबिरासाठी महाराष्ट्र शासनाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले की, या शिबिरांमध्ये महसूल विभागासोबत शासनाचे विविध महत्त्वाचे विभाग सहभागी होणार असून नागरिकांना लागणाऱ्या सेवा, दाखले आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी तत्काळ देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल यांनी सांगितले की, सातारा शहरात हे शिबिर उद्या सकाळी १० वाजता ‘पोलीस करमणूक केंद्र’ येथे आयोजित करण्यात आले आहे. या ठिकाणी महसूल विभागासह कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग, आयजीआर विभाग, आयसीडीएस विभाग आदी विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.
या शिबिरामध्ये नागरिकांना उत्पन्नाचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, डोमिसाईल, नॉन-क्रिमीलेअर (NCL) दाखले यांसारख्या महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच डिजिटल ७/१२ व ८-अ उतारे क्यूआर कोड व डिजिटल स्वाक्षरीसह देण्यात येणार आहेत.
याशिवाय फेरफार प्रकरणांचा निपटारा, प्रलंबित प्रकरणांचे जागेवर निराकरण, अकृषक (NA) परवाना व गुंठेवारी संदर्भातील मार्गदर्शन, तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आदी विविध सामाजिक योजनांचे लाभही वितरित केले जाणार आहेत.
प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, सर्व सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.