(सतीश कर्वे /प्रतिनिधी) :मुंबई पोलिस दलात तब्बल १२ तासांची ड्युटी सांभाळत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत विडणी येथील कैलास हणमंतराव अभंग यांनी पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर यश संपादन केले आहे. त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
सन २००७ साली पोलिस दलात भरती झालेल्या कैलास अभंग यांच्या मनात सुरुवातीपासूनच पोलिस उपनिरीक्षक होण्याचा दृढनिश्चय होता. मुंबई पोलिस दलात गोरेगाव येथे कार्यरत असताना त्यांनी नोकरी आणि अभ्यास यांचा समतोल साधत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. दिवसाचे १२ तास काम करूनही त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले.
या प्रवासात त्यांना दोनदा अपयश आले, मात्र त्यांनी खचून न जाता आत्मविश्वासाने पुन्हा उभारी घेतली. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा तसेच मैदानी चाचण्यांतील चुका सुधारत अखेर त्यांनी यश मिळवत पोलिस उपनिरीक्षक पद गाठले.
आपल्या यशामागे आई-वडील, भाऊ आणि पत्नी यांचे मोलाचे पाठबळ असल्याचे कैलास अभंग यांनी सांगितले.त्यांच्या या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.