आपला जिल्हा

महाविकास आघाडीची जावली ग्रामपंचायतीवर नजर ; आरक्षणामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली

(जावली / अजिंक्य आढाव) : जावली ग्रामपंचायत निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण तापू लागले असून महाविकास आघाडीने निवडणूक मैदानात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समविचारी नागरिकांना सोबत घेऊन ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व उभे करण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकजूट निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असून, आगामी निवडणुकीत विकास हा प्रमुख मुद्दा राहणार असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जावली ग्रामपंचायतीचे वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीची गणिते मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. यंदाच्या आरक्षणात महिला व राखीव प्रवर्गांना अधिक प्रतिनिधित्व मिळाल्याने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी निर्माण झाली आहे. तर काही पारंपरिक दावेदारांना आरक्षणामुळे निवडणूक लढविण्याच्या संधीपासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.

जाहीर आरक्षणानुसार –

वॉर्ड क्रमांक 1 : SC महिला, सर्वसाधारण महिला, ओबीसी सर्वसाधारण

वॉर्ड क्रमांक 2 : SC सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण

वॉर्ड क्रमांक 3 : ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण

रोटेशन पद्धतीनुसार आरक्षण लागू झाल्याने अनेक पॅनल प्रमुखांची पूर्वनियोजित रणनीती विस्कळीत झाली आहे. त्यामुळे उमेदवार निवडीपासून ते पॅनल रचनेपर्यंत नव्याने राजकीय गणिते मांडावी लागत आहेत. योग्य उमेदवारांचा शोध, सामाजिक समतोल आणि मतदारसंघातील समीकरणे जुळविण्यासाठी सर्वच गटांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

आरक्षण जाहीर होताच संभाव्य उमेदवारांनी जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली असून गावातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडी, स्थानिक आघाड्या आणि इतर पॅनल यांच्यातील संभाव्य युती-आघाड्यांबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे यंदाची जावली ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!