आपला जिल्हा

लोकवर्गणीतून पर्यावरण संवर्धनाची नवी चळवळ ; जिंती गावाचा ‘सह्याद्री देवराई’ अंतर्गत ग्रीन जिंती प्रोजेक्ट जिल्ह्यासाठी प्रेरणादायी

(फलटण/ प्रतिनिधी) : हवामानातील सातत्याने होत असलेले बदल, वाढते तापमान आणि पर्यावरणीय असंतुलन ही आजची गंभीर समस्या बनली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हा सर्वात प्रभावी उपाय असून, सह्याद्री देवराई उपक्रमांतर्गत जिंती (ता. फलटण) येथे राबविण्यात येत असलेला ग्रीन जिंती प्रोजेक्ट २०२६ हा आदर्शवत उपक्रम आहे. वृक्ष लागवड आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात जिंती गाव सर्वांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी व्यक्त केला.

जिंती येथे सह्याद्री देवराईच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ग्रीन जिंती प्रोजेक्ट २०२६ अंतर्गत वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन अभियानाचा शुभारंभ तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी, डॉ. विजय रणवरे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, युवराज पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना तहसीलदार डॉ. जाधव म्हणाले की, वाढत्या तापमानामुळे झाडांचे महत्त्व सर्वांना नव्याने जाणवू लागले आहे. झाडांमुळे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच पावसाचे प्रमाण वाढण्यासही हातभार लागतो. मात्र केवळ वृक्षारोपण करून थांबून चालणार नाही, तर त्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी केवळ वन विभाग किंवा प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाने त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यायला हवा. नागरिकांचा सहभाग वाढला तर गाव आणि तालुका पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात निश्चितपणे अग्रेसर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना डॉ. प्रसाद जोशी म्हणाले की, स्वच्छ आणि सुंदर पर्यावरणासाठी वृक्षारोपण व देवराई निर्मिती अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अशा उपक्रमांना गावोगावी प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. आज रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर रुंदीकरण व विकास होत असताना अनेक जुन्या वृक्षांची तोड होत आहे. अनेक वर्षे वाढलेली झाडे तोडली जातात, मात्र ती पुन्हा निर्माण होण्यासाठी अनेक दशके लागतात. त्यामुळे होत असलेली वृक्षतोड ही मोठी शोकांतिका आहे.तसेच काही ठिकाणी राबविण्यात येत असलेल्या नक्षत्र वन संकल्पनेची माहिती देताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक राशीनुसार नक्षत्राचे झाड लावले जाते. या झाडांच्या सानिध्यात वेळ घालवल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आरोग्य, मन आणि शरीरावर होत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. या नक्षत्र वनामध्ये वड, पिंपळ, करंज, अर्जुन, चंदन, आवळा, जांभूळ यांसारख्या देशी वृक्षांचा समावेश असतो.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!