(फलटण/ प्रतिनिधी )फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील युवा कार्यकर्त्यांकडून युवा सेना फलटण तालुका प्रमुखपदी अजय सुळ यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारे नेतृत्व म्हणून अजय सुळ यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अजय सुळ यांनी ग्रामीण भागातील तळागाळातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, अपंग व्यक्तींसाठीच्या योजना, विधवा पेन्शन योजना यांसह विविध सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून अनेक पात्र लाभार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
याशिवाय कृषी क्षेत्रातील विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना अनुदान, पीकविमा, कृषी यांत्रिकीकरण तसेच इतर कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशन कार्ड, धान्य वाटप, विविध अन्नसुरक्षा योजनांचा लाभ पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठीही त्यांनी प्रभावी कार्य केले आहे.
शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, सामाजिक क्षेत्रात विविध जनहिताचे उपक्रम आणि सहकार क्षेत्रातील सक्रिय सहभाग यामुळे अजय सुळ यांच्याबद्दल युवकांमध्ये मोठा विश्वास निर्माण झाला आहे. गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल सर्व स्तरातून घेतली जात आहे.
फलटण तालुक्यात युवा सेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी, ग्रामीण भागातील युवकांना नेतृत्वाची संधी मिळवून देण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी अजय सुळ यांची युवा सेना फलटण तालुका प्रमुखपदी नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील युवा कार्यकर्त्यांकडून होत आहे.
“तळागाळातील नागरिकांशी असलेला थेट संपर्क, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याची तळमळ, सामाजिक बांधिलकी आणि युवकांना एकत्रित घेऊन काम करण्याची क्षमता यामुळे अजय सुळ हे युवा सेना तालुका प्रमुख पदासाठी सक्षम व योग्य नेतृत्व ठरतील,” अशी भावना ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.