कृषी व व्यापार

बाजरी पीक शेती शाळेत शेतकऱ्यांना आधुनिक व नैसर्गिक शेतीचे धडे

जावलीत शेती शाळेद्वारे शेतकऱ्यांना माती परीक्षण, कीड नियंत्रण व विविध योजनांची माहिती

(जावली/अजिंक्य आढाव): महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय फलटण, मंडल कृषी अधिकारी कार्यालय बरड व ग्रामपंचायत जावली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (आत्मा) अंतर्गत शेतकऱ्यांची शेती शाळा – बाजरी पीक या उपक्रमाचा दुसरा वर्ग दिनांक १२ जून २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.

या वर्गात विविध कृषी विषयांवर तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. सहाय्यक कृषी अधिकारी सतीश हिप्परकर यांनी शेती शाळेची रूपरेषा, शेतकऱ्यांची पूर्व प्रशिक्षण चाचणी (Before Training Test), माती परीक्षणाचे महत्त्व, माती नमुने घेण्याची पद्धत तसेच फेरोमोन ट्रॅप्स व पक्षी थांबे याविषयी सविस्तर माहिती दिली.

सहाय्यक कृषी अधिकारी संजय करचे यांनी हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर आणि हुमणी किडीचे जीवनचक्र याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सहाय्यक कृषी अधिकारी अरविंद नाळे यांनी पाणी फाउंडेशन व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत शेतकऱ्यांना समजावून सांगितली.

यावेळी मंडल कृषी अधिकारी स्वप्निल बनकर यांनी फळबाग लागवड, खरीप हंगामातील बाजरी प्रकल्प, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, महाविस्तार एआय ॲप, ॲग्रीस्टॅक यांसह विविध कृषी योजनांची माहिती दिली. उपकृषी अधिकारी संजय अभंग यांनी कृषी यांत्रिकीकरण योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, पीक विमा व फळपीक विमा याविषयी मार्गदर्शन केले.शेती शाळेचे आयोजन सीआरपी नंदाताई नाळे व कृषी सखी उज्वला नाळे यांनी केले. या कार्यक्रमास महिला व पुरुष मिळून सुमारे ४० शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सांघिक खेळ, अल्पोपहार, शेती शाळेचे मूल्यमापन करून वर्गाचा समारोप करण्यात आला. शेतकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

Back to top button
Don`t copy text!