(जावली / अजिंक्य आढाव ): स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या एलपीजी गॅसच्या संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती गॅसला प्राधान्य देत हॉटेल व इतर व्यावसायिक क्षेत्रासाठी गॅस पुरवठ्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतल्याने हॉटेल व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे हॉटेल व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला असून अनेक व्यावसायिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गॅस हा हॉटेल व्यवसायाचा मुख्य आधार असल्याने पुरवठा खंडित झाल्यास व्यवसाय चालवणे अशक्य होणार आहे. सध्या अनेक हॉटेल चालकांना पर्यायी व्यवस्था करणे कठीण जात असून आर्थिक फटका बसत आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास अनेकांना हॉटेल बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी प्रतिक्रिया हॉटेल व्यवसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसायिकांच्या अडचणींबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी फलटण तालुका हॉटेल असोसिएशनच्या वतीने मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता फलटण तहसील कार्यालय येथे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे. या बैठकीस सर्व हॉटेल व्यावसायिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.