(फलटण/ प्रतिनिधी)फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्वस्त व पर्यावरणपूरक इंधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी काही वर्षांपूर्वी राबविलेला बायोगॅस प्रकल्प आज अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे दिसून येत आहे. गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गाई-म्हशींच्या शेणापासून बायोगॅस तयार करण्यासाठी गोटे व बायोगॅस प्रकल्प उपलब्ध करून देण्यात आले होते.
या उपक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात स्वयंपाकासाठी लागणारा गॅस थेट शेणापासून तयार होऊ लागला असून एलपीजी सिलेंडरवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. परिणामी ग्रामीण भागात स्वस्त, सातत्याने उपलब्ध आणि पर्यावरणपूरक इंधनाचा पर्याय निर्माण झाला आहे.
सध्या जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होऊन काही ठिकाणी एलपीजी टंचाईची चर्चा सुरू आहे. मात्र बायोगॅस प्रकल्पाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या परिस्थितीत इंधन टंचाईची चिंता नसल्याचे स्पष्ट होत आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गाईंच्या शेणापासून तयार होणाऱ्या बायोगॅसमुळे घरगुती स्वयंपाकासाठी सतत इंधन उपलब्ध होते. याच प्रक्रियेतून तयार होणारी स्लरी शेतीसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणून वापरता येत असल्याने उत्पादनक्षमता वाढण्यासही मदत होत आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागात ऊर्जा स्वावलंबनाचा मार्ग खुला झाला असून सध्याच्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाचे शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे.