आपला जिल्हा

जगात त्यागमूर्ती फक्त रमाईच होऊ शकते – महावीर भालेराव

(फलटण / प्रतिनिधी)-  भारतभूमी ही साधू-संतांची, विचारवंतांची व महापुरुषांची भूमी म्हणून ओळखली जाते. मात्र या महापुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष करणाऱ्या, त्याग व समर्पणाने समाज घडवणाऱ्या महामातांचीसुद्धा हीच भूमी आहे, हे आपण विसरता कामा नये. अशा महामातांमध्ये त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुका यांचे अध्यक्ष महावीर भालेराव यांनी केले.

ते दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मौजे राजाळे येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.महावीर भालेराव पुढे म्हणाले की, माता रमाई म्हणजे त्याग, सहनशीलता व समर्पण यांचा जिवंत आदर्श होय. रमाई यांनी आपल्या आयुष्यभर केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या उद्धारासाठी स्वतःचे सुख, आरोग्य आणि मातृत्वसुद्धा अर्पण केले. त्यांच्या स्वतःच्या पोटच्या चार मुलांचा औषधोपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाला, तरीही त्यांनी कधीही ध्येयापासून माघार घेतली नाही. घरखर्चातून काटकसर करून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ती मदत पुरवली आणि एक महान बोधिसत्व घडवला.

“असा अपार त्याग जगातील कोणतीही स्त्री करू शकणार नाही. म्हणूनच ‘जगात त्यागमूर्ती फक्त रमाईच होऊ शकते’,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. समाजाने माता रमाई यांच्या जीवनातील त्याग, संयम आणि संघर्षाचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या प्रसंगी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच सर्व उपस्थितांना माता रमाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी महावीर भालेराव यांनी रमाईच्या कार्यकर्तृत्वाला एका गीताच्या माध्यमातून तिच्या कार्याला अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, राजाळे (भीमनगर) यांच्या वतीने येथील धम्मदीप बुद्ध विहारात माता रमाई यांची १२९ वी जयंती अत्यंत उत्साहात, श्रद्धा व आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!