(जावली /अजिंक्य आढाव ): आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, निंभोरे ते फडतरवाडी रोडवर अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेस ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून देशी दारूच्या ४८ बाटल्या आणि वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण ₹९३,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.४० वाजण्याच्या सुमारास साखरवाडी पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत फलटण ग्रामीण पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत होते. यावेळी निंभोरे ते फडतरवाडी रोडवर एक महिला मोटारसायकलवरून संशयास्पदरीत्या जाताना आढळून आली.पोलिसांनी सदर महिलेस थांबवून पंचांसमक्ष तिच्या ताब्यातील वाहनाची तपासणी केली. यावेळी मोटारसायकलवरील पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये १८० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या ४८ सीलबंद बाटल्या, किंमत ₹३,८४०, आढळून आल्या. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली अंदाजे ₹९० हजार रुपये किमतीची मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली. असा एकूण ₹९३,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अबक, वय ४८ वर्षे, रा. निंभोरे, ता. फलटण, जि. सातारा हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, अवैध दारू वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पिसे, पोलीस हवालदार पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल देशमुख यांच्या पथकाने केली.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री व वाहतुकीविरुद्धची कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.