वाठार निंबाळकर येथे दुचाकीला अज्ञात चारचाकीची जोरदार धडक; पती व दोन मुली जखमी, चालक फरार
(फलटण/प्रतिनिधी) :फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर हद्दीत फलटण–पुसेगाव मार्गावर अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुचिता अमर चव्हाण (वय २७) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे पती अमर धोंडीराम चव्हाण आणि दोन मुली आरोही व आराध्या जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका अपघात कसा घडला.?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास वाठार निंबाळकर गावच्या हद्दीत सुनील कुंभार यांच्या वीटभट्टीजवळ हा अपघात झाला. अमर चव्हाण हे त्यांच्या दुचाकीवरून पत्नी सुचिता आणि मुली आरोही व आराध्या यांना घेऊन जात होते. यावेळी पुसेगावच्या दिशेकडून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनचालकाने रॉंग साईडने, भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकीवरील चौघेही जखमी झाले. अपघातानंतर संबंधित चारचाकी चालकाने जखमींना वैद्यकीय मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केले.
पुण्यात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सुचिता अमर चव्हाण यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू
या प्रकरणी महेंद्र भगवान पुंडेकर (वय ३५, रा. वाठार निंबाळकर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०६, १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातातील अज्ञात चारचाकी वाहन आणि त्याच्या चालकाचा शोध फलटण ग्रामीण पोलीस घेत आहेत. अपघाताबाबत कोणाकडे काही माहिती असल्यास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार करीत आहेत.
संपर्क :
-
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ : ८६०५०४२७७७
-
पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार : ९८५१९१५१५१
-
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे : ०२१६६२२२५३३