(जावली /अजिंक्य आढाव ): फलटण संस्थानचे कर्तबगार अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्यातून समाजविकासाची प्रेरणा मिळते. शिक्षण, शेती, सहकार, पाणी, ग्रामीण विकास आणि सामाजिक समतेच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आजही मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी केले.
श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त मुधोजी महाविद्यालयाच्या विशेष दिन समितीच्या वतीने जयंती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पंढरीनाथ कदम होते. प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी श्रीमंत मालोजीराजांच्या बहुआयामी कार्याचा आढावा घेतला.
प्रा. वेळेकर म्हणाले, “श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर हे दूरदृष्टीचे आणि समाजहिताची जाण असलेले लोकनेते होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, शेतकरी वर्गाला पाणी व कर्जपुरवठ्याच्या सुविधा मिळाव्यात तसेच लघुउद्योगांना चालना मिळावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.”
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षणविस्ताराला चालना देत विविध प्राथमिक शाळा, विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये आणि महाविद्यालयांच्या विकासाची पायाभरणी करण्यात मालोजीराजांचा महत्त्वपूर्ण वाटा होता, असेही त्यांनी नमूद केले.
सामाजिक समतेच्या क्षेत्रातील मालोजीराजांच्या पुरोगामी भूमिकेवर प्रकाश टाकताना प्रा. वेळेकर म्हणाले की, अस्पृश्यता हा मानवी जीवनाला लागलेला कलंक आहे, या जाणिवेतून त्यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला. माधवराव आहिवळे या दलित समाजातील व्यक्तीला कायदेमंडळावर सदस्य म्हणून नेमून संस्थानात मानाचे स्थान देत त्यांनी सामाजिक समतेचा आदर्श निर्माण केला.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातही श्रीमंत मालोजीराजांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. तसेच महाराष्ट्र शासनातील सहकार मंत्री व बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना महाराष्ट्र सचिवालयाची इमारत, कोयना धरणाचे काम आणि प्रतापगडावरील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांसारख्या महत्त्वपूर्ण कामांत त्यांनी योगदान दिले. या माध्यमातून त्यांनी मराठी मनाची अस्मिता जोपासली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रो. डॉ. पंढरीनाथ कदम म्हणाले, “श्रीमंत मालोजीराजांचे कार्य एका संस्थानापुरते मर्यादित नव्हते. शिक्षण, शेती, सहकार, पाणी आणि सामाजिक समता यांच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाची दिशा त्यांनी दाखवून दिली. त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीने आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे.”
यावेळी इतिहास विभागप्रमुख व विशेष दिन समितीचे अध्यक्ष प्रो. डॉ. संतोष कदम, प्रसिद्धी विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. प्रभाकर पवार, इंग्रजी विभागप्रमुख प्रो. डॉ. संजय दीक्षित, तत्त्वज्ञान विभागप्रमुख प्रो. डॉ. नवनाथ रासकर, हिंदी विभागाध्यक्ष प्रो. डॉ. नितीन धवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल टिके यांनी केले, तर आभार प्रा. अभिजीत कदम यांनी मानले. यावेळी महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य, विविध समित्यांचे समन्वयक, प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.