(दहिवडी/प्रतिनिधी ):माण तालुक्यातील मार्डी येथील पवारवाडीमध्ये वृद्ध दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणातील संशयिताचा शोध घेण्यासाठी दहिवडी पोलिसांनी शोधपत्रिका प्रसिद्ध केली आहे. आबा बाबा पवार (वय ४५, रा. पवारवाडी, मार्डी, ता. माण, जि. सातारा) असे संशयिताचे नाव असून, तो दिसून आल्यास किंवा त्याच्या वास्तव्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माण तालुक्यातील मार्डी येथील पवारवाडीमध्ये वृद्ध दाम्पत्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या घटनेत वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास दहिवडी पोलीस करीत आहेत.या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) व १०९(१) नुसार गुन्हा नोंदविण्यात आल्याचे शोधपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.संशयिताचे वर्णन पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या शोधपत्रिकेनुसार, संशयित आबा बाबा पवार याचे वय ४५ वर्षे असून, त्याची उंची अंदाजे पाच फूट सहा इंच आहे. त्याचा रंग सावळा असून, अंगात पिवळ्या रंगाचा टी-शर्ट, त्यावर लाल रंगाची फुल पँट, उजव्या हातात कडे आणि पायात सँडल असे त्याचे वर्णन देण्यात आले आहे. त्याच्या दाढीला केलेली मिशी असून, तो दारू पिण्याच्या सवयीचा असल्याचेही वर्णनात नमूद आहे. तो काळ्या रंगाची हिरो होंडा एसएससारखी मोटारसायकल वापरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन
संशयित आबा बाबा पवार याला पकडण्यासाठी किंवा त्याच्या वास्तव्याबाबत माहिती मिळविण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास दहिवडी पोलीस ठाणे, सातारा नियंत्रण कक्ष किंवा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास दहिवडी पोलीस करीत असून, संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.