(जावली/ अजिंक्य आढाव )दिल्ली येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत फलटण तालुक्यातील विडणी गावची उदयोन्मुख कुस्तीपटू श्रीनिधी निखिल अभंग हिने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. १४ वर्षांखालील वयोगटातील ३६ किलो वजनगटात सहभागी झालेल्या श्रीनिधीने सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखत उपांत्य फेरीसह अंतिम फेरीतही एकतर्फी विजय मिळवला. तिच्या या दैदीप्यमान यशामुळे विडणी गावाच्या क्रीडा वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत श्रीनिधीने दाखवलेली जिद्द, आत्मविश्वास, कुस्तीतील कौशल्य आणि प्रतिस्पर्ध्यांवर मिळवलेले निर्विवाद वर्चस्व कौतुकास्पद ठरले. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत आपल्या खेळातील सातत्य सिद्ध करत तिने सुवर्णपदक पटकावले. तिच्या या यशाने विडणीसह फलटण तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रीनिधी ही कुस्ती क्षेत्रातील परिचित नाव असलेले पैलवान तानाजी महाराज अभंग यांची नात असून पुणे पोलीस दलात कार्यरत असलेले निखिल अभंग यांची कन्या आहे. कुस्तीचा वारसा लाभलेल्या कुटुंबातील श्रीनिधीने राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवत आपल्या मेहनतीची आणि जिद्दीची यशस्वी मोहोर उमटवली आहे.
तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल विडणी ग्रामस्थ आणि भैरवनाथ तालीम मंडळाच्या वतीने श्रीनिधीचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. तिच्या यशामुळे गावातील नवोदित खेळाडूंनाही कुस्ती क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली असून भविष्यात ती राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या खेळाचा ठसा उमटवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
विडणीच्या मातीतील या सुवर्णकन्येच्या यशाने गावाचा नावलौकिक राष्ट्रीय कुस्तीच्या आखाड्यात पोहोचला असून तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.