(जावली/ अजिंक्य आढाव ): फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारणांनी हरविलेले तसेच गहाळ झालेले मोबाईल शोधून संबंधित नागरिकांना परत मिळवून देण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना उल्लेखनीय यश आले आहे. सुमारे 12लाख 80हजार रुपये किमतीचे एकूण 71मोबाईल पोलिसांनी शोधून काढले असून, ते संबंधितांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरविलेल्या मोबाईलबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सौ. सातारा यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल शोध मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार फलटण ग्रामीण पोलिसांनी प्राप्त झालेल्या तक्रारी सीईआयआर पोर्टलवर अपलोड करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित मोबाईल कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या सिमकार्डवर सुरू आहेत, याची माहिती मिळविली. तपासादरम्यान काही मोबाईल सातारा जिल्ह्याबाहेर तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये वापरले जात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी संबंधित मोबाईल वापरकर्त्यांशी संपर्क साधून त्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील मोबाईल पोलिसांकडे परत मिळविण्यात आले. काही मोबाईल कुरिअरद्वारे तर काही प्रत्यक्ष ताब्यात घेण्यात आले. तक्रारदार लांब अंतरावर राहत असल्यास त्यांना मोबाईल कुरिअरद्वारे पाठविण्याची सुविधाही पोलिसांकडून करण्यात आली.
सप्टेंबर 2026 अखेरपर्यंत एकूण 71 मोबाईल शोधण्यात आले असून, त्यांची अंदाजे बाजारातील किंमत 12 लाख 80 हजार रुपये आहे. हरविलेल्या मोबाईलचा शोध घेऊन ते पुन्हा नागरिकांच्या ताब्यात देण्यात आल्याने संबंधित नागरिकांनी फलटण ग्रामीण पोलिसांचे आभार व्यक्त केले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक फलटण विभाग धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनवळ, पोलीस निरीक्षक डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार तसेच सीईआयआर पोर्टलचे काम पाहणारे कर्मचारी श्रीनाथ कदम, पो.हवा. नितीन चतुरे, अमोल जगदाळे व हनुमंत दडस यांनी केली.
हरविलेल्या मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने शोध घेत नागरिकांना त्यांची मालमत्ता परत मिळवून देण्याची फलटण ग्रामीण पोलिसांची ही कारवाई निश्चितच उल्लेखनीय ठरली