दहिवडी पोलिसांची मोठी कामगिरी.! ७ लाख २० हजारांचे २९ मोबाईल शोधून नागरिकांना परत सातारा, कोल्हापूर आणि सांगलीतून हस्तगत; नवरात्रोत्सवात दहिवडी पोलिसांची नागरिकांना अनोखी भेट.!
(जावली /अजिंक्य आढाव )नागरिकांचे हरवलेले तसेच चोरीला गेलेले मोबाईल शोधून ते पुन्हा संबंधित नागरिकांच्या हातात सुपूर्द करण्याची उल्लेखनीय कामगिरी दहिवडी पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी तब्बल ७ लाख २० हजार रुपये किमतीचे २९ मोबाईल हँडसेट शोधून हस्तगत केले असून, ते संबंधित नागरिकांना परत करण्यात आले आहेत.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहिवडी पोलिसांकडून नागरिकांना मिळालेली ही अनोखी भेट ठरली आहे.
दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध ठिकाणांहून नागरिकांचे मोबाईल हरवले होते, तर काही मोबाईल चोरीला गेले होते. याबाबत नागरिकांनी दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी हरवलेल्या व चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले.
मोबाईल हँडसेटच्या तक्रारींचा अनुषंगाने सी.ई.आय.आर. पोर्टल तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी तपास केला. या तपासादरम्यान सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतून ७ लाख २० हजार रुपये किमतीचे २९ मोबाईल हँडसेट शोधून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर हे सर्व मोबाईल संबंधित नागरिकांना परत देण्यात आले.
हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी दहिवडी पोलिसांचे आभार मानले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, तांत्रिक तपासाच्या मदतीने हरवलेल्या वस्तूंचा शोध घेण्याच्या पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची कामगिरी
ही उल्लेखनीय कामगिरी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यामध्ये पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब दौलताडे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रहार खाडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार बापू खांडकेकर, सचिन जगताप, पोलीस नाईक नितीन धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुंडले, महेंद्र खाडे, अजिनाथ नरवट आणि आसिफ नदाफ यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
दहिवडी पोलिसांच्या या कामगिरीमुळे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेऊन नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच पोलिसांप्रती नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.