(जावली /अजिंक्य आढाव )निंबळक गावाच्या सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे स्वर्गीय मोहनराव विठ्ठलराव नाईक निंबाळकर (बापू) यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा आणि आठवणींचा गौरवपूर्ण उजाळा देण्यात आला. बापूंच्या मार्गदर्शनामुळेच आम्हाला समाजसेवेची प्रेरणा मिळाली. त्यांनी दिलेले संस्कार, सामाजिक भान आणि जनसेवेचा विचार हीच आमच्या पुढील वाटचालीची खरी शिदोरी असल्याची भावना सातारा जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी व्यक्त केली.
स्वभावाने शांत, संयमी, मनमिळाऊ आणि दूरदृष्टी असलेले मोहनबापू हे निंबळक गावाच्या सर्वांगीण विकासातील महत्त्वाचे मार्गदर्शक होते. राजकारणाकडे केवळ सत्तेचे साधन म्हणून न पाहता समाजकारण आणि जनसेवेचे माध्यम म्हणून त्यांनी त्याचा उपयोग केला. सर्व जाती-धर्मांतील नागरिकांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची भूमिका नेहमीच प्रेरणादायी राहिली.
सहकार क्षेत्रातून विकासाला चालना
गावाच्या आणि परिसराच्या आर्थिक विकासासाठी सहकार क्षेत्राचे महत्त्व ओळखून बापूंनी १९९१ मध्ये निंबळक येथे श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून गरजू नागरिकांना आर्थिक सहकार्य, सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी प्रोत्साहन, तसेच बचतगटातील महिलांना आर्थिक पाठबळ देत रोजगारनिर्मितीला चालना दिली. आज या संस्थेचा विस्तार निंबळक, फलटण आणि पवारवाडीपर्यंत झाला आहे.
अनेक कुटुंबांच्या उभारणीत मोलाचा वाटा
बापूंच्या सामाजिक कार्यातील सर्वाधिक उल्लेखनीय योगदान म्हणजे त्यांनी परिसरातील अनेक तरुणांना विविध संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. एका तरुणाला नोकरी मिळणे म्हणजे संपूर्ण कुटुंबाला आधार मिळणे, या उदात्त भावनेतून त्यांनी अनेक कुटुंबांच्या जीवनात स्थैर्य निर्माण केले. युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे बापू सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी होत असत.
सहकार, राजकारण, शिक्षण, कृषी, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत त्यांनी सक्रिय योगदान दिले. श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक, श्रीमंत रामराजे सहकारी वाहतूक संस्था आणि श्रीराम सहकारी साखर कारखाना अशा संस्थांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. जायंट्स ग्रुप ऑफ फलटणच्या माध्यमातूनही त्यांनी सामाजिक उपक्रमांना हातभार लावला.
बापूंचे मार्गदर्शन हीच आमच्या कार्याची प्रेरणा
सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, माझे पती संदीप सावळा कांबळे आणि मला आज समाजासाठी जे काही कार्य करता येत आहे, त्यामागे बापूंचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि त्यांनी दिलेले संस्कार आहेत. माझ्या सार्वजनिक जीवनातील वाटचालीत बापूंचे स्थान पितृतुल्य मार्गदर्शकाचे राहिले आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना त्यांनी दिलेली शिकवण आणि जनतेशी नाते जोडण्याची त्यांची कार्यपद्धती कायम प्रेरणा देत राहील. त्यांच्या ऋणातून मुक्त होणे शक्य नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
आठवणी कायम, विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प बापूंचे जाणे हे निंबळक गावासह संपूर्ण परिसरासाठी मोठे नुकसान आहे. त्यांचे शांत स्मितहास्य, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती, अडचणीच्या काळात मदतीला धावून जाण्याचा स्वभाव आणि समाजासाठी झटण्याची तळमळ आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
त्यांनी निर्माण केलेल्या सामाजिक जिव्हाळ्याच्या नात्यांची आणि जनसेवेच्या विचारांची जपणूक करणे, हाच त्यांना खरा आदरांजली ठरेल. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बापूंनी दिलेला समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी व्यक्त केला.
स्वर्गीय मोहनराव नाईक निंबाळकर (बापू) यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.