(फलटण/ प्रतिनिधी) : माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथील श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना 5 ऑगस्टच्या रात्री ते 6 ऑगस्टच्या पहाटेच्या सुमारास घडल्याचे निवेदनातून समोर आले आहे. या प्रकरणी आरोपींचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी अहिंसा युवक कमिटी व बहुउद्देशीय सेवा संस्था, फलटण यांच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून चांदीच्या तीन मूर्ती, चांदीचे छत्र, सोन्याचा मुलामा दिलेल्या कलशाचा बेस, तसेच दानपेटी व काचेची दानपेटी फोडून त्यातील रोकड असा ऐवज चोरून नेल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून, परिसरातील नागरिक व भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीचा तातडीने तपास करून चोरीला गेलेल्या धार्मिक वस्तू व ऐवजाचा शोध घ्यावा, तसेच संबंधित आरोपींना अटक करावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.
याशिवाय दहिगाव येथील जैन मंदिरासह परिसरातील धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित प्रशासन व पोलिस यंत्रणेला द्यावेत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन फलटण तहसीलदार तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.