(फलटण/ प्रतिनिधी)- “शांततेच्या मार्गातही क्रांतीची बीजे जोमाने रुजत असतात.कारण त्यात सहिष्णुतेचा भाग अधिक असतो. महात्मा गांधीजींनी सर्व विश्वाला दिलेली, ‘अहिंसा आणि सविनय सत्याग्रहाचा मार्ग ‘ ही अमोल देणगी आहे.त्यामुळे महात्मा गांधीजी केवळ राष्ट्रपिता ठरत नाहीत तर ते विश्वपिता ठरतात” असे प्रतिपादन श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रो.डॉ.महेशकुमार सोनावणे यांनी केले. मुधोजी महाविद्यालय फलटण अमृत महोत्सवी वर्ष तसेच ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने,इतिहास विभाग व मालोजीराजे इतिहास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहास विभागात आयोजित “महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान “या विषयावरील कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.पी.एच. कदम हे होते.
डॉ.कदम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात “विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी महापुरुषांनी केलेल्या त्यागाचे व बलिदानाचे स्मरण करून इतिहास जगला व जागविला पाहिजे “असे सूतोवाच केले.
आरंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महात्मा गांधीजी व श्रीमंत मालोजीराजे नाईक -निंबाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व सुमनांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मालोजीराजे इतिहास मंडळाचे प्रमुख प्रा.डॉ. ए.एस. टिके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर इतिहास विभागप्रमुख प्रो.डॉ.एस.टी कदम यांनी कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट करून ९ ऑगस्ट क्रांती दिन व महात्मा गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले.
कार्यक्रमास आयक्यूएसी समन्वयक डॉ.टी.पी. शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच प्रा.अभिजीत कदम, प्रा. गिरीश पवार,प्राध्यापिका प्रियांका शिंदे हेही उपस्थित होते.कार्यक्रमास इतिहास विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी आपल्या मनोगतातून ;भारत देश व स्वातंत्र्यवीर यांच्याविषयी आपल्या राष्ट्रीय भावना व्यक्त केल्या.आपल्या बहारदार शैलीत सूत्रसंचालनातून इतिहास विभागाच्या प्राध्यापिका डॉ. योगिता मठपती यांनी श्रोत्यांची मने जिंकली. तर सर्व उपस्थितांचे विद्यार्थी श्री.अमर बाबर यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.