लोधवडेत वृद्ध दाम्पत्याच्या घरावर दरोडा ; दहिवडी पोलिसांनी टोळीला ठोकल्या बेड्या हत्यारांचा धाक दाखवून २ लाख ६० हजारांचे सोने लुटले; ७ आरोपी व एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
(जावली /अजिंक्य आढाव )दहिवडी ता.माण तालुक्यातील लोढवडे येथील नाळवावस्ती येथे वृद्ध दाम्पत्याच्या घरावर रात्रीच्या सुमारास दरोडा टाकून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा दहिवडी पोलिसांनी छडा लावला आहे. पोलिसांनी ७ आरोपी व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून, सुमारे ३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडी व दरोडेखोरांच्या टोळीला मोठा दणका बसला आहे.
मौजे लोढवडे, ता. माण, जि. सातारा येथील नाळवावस्ती येथे नारायण बीरा चोपडे (वय ६६) यांच्या राहत्या घरात दि. १०/०७/२०२६ रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी प्रवेश केला. हत्याराचा धाक दाखवत त्यांना गप्प बसण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादीची पत्नी सौ. तंगूबाई हिच्या पेटी व कपाटाची चावी मागून घेतली.
चावी मिळाल्यानंतर आरोपींनी घराचा दरवाजा उघडून पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने, मोहनमाळ, राणीहार, कर्णफुले व जातवळी तसेच तंगूबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र हिसकावून नेले. या दागिन्यांची एकूण किंमत २ लाख ६० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास करताना मा. पोलीस अधीक्षक मा. वैशाली कडकर, सो. उपविभागीय पोलीस अधिकारी मा. रणजीत सावंत, सो. उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी उपविभाग कॅम्प वडूज यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागातील तांत्रिक पुरावे व गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला.
पोलिसांनी कसोशीने तपास करून एकूण ७ आरोपी व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले सर्व दागिने, गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे, चार मोटारसायकली व रोख रक्कम, असा एकूण ३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कारवाईत पोलिसांचे पथक सक्रिय
सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, चांदणी मोटे, महिला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार श्रीनिवास सानप, रामचंद्र गाढवे, रविंद्र खाडे, सचिन जगताप, पोलीस नाईक नितीन धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरवट, निलेश कुडळे, महेंद्र खाडे, अजय भोसले, मल्हारी खाडे व सायबर विभाग सातारा यांनी केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास भाऊसाहेब गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहिवडी पोलीस स्टेशन हे करीत आहेत