(जावली /अजिंक्य आढाव): महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटणाऱ्या चोरट्याला फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले. या कारवाईमुळे फलटण ग्रामीण पोलिसांच्या तपास कौशल्याचे कौतुक होत आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विडणी, ता. फलटण गावच्या हद्दीतील २४ फाटा येथे ही घटना घडली. महिला आपल्या शेतामधून काम करून घरी जात असताना आरोपीने निर्मनुष्य ठिकाण हेरून तिचा पाठलाग केला. त्यानंतर महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यातील सोन्याचा दागिना जबरदस्तीने काढून घेतला.
याबाबत महिलेने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास पथक तयार केले. आरोपी विडणी गावातील असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली.
या प्रकरणात अथर्व उर्फ चिन्मय छगन सुतार (वय २०, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.अधिक चौकशीदरम्यान आरोपीने केरळ येथे फिरायला जाण्यासाठी पैसे मिळविण्याच्या उद्देशाने चोरी केल्याचे सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय गोडसे यांच्या सूचनेनुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. तपासात पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, तसेच पोलीस कर्मचारी नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, हनुमंत दंडस, तुषार नलवडे व अविनाश शिंदे यांनी सहभाग घेतला.