(जावली/ अजिंक्य आढाव ): मुधोजी महाविद्यालय, फलटणचे मा. प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राचार्य निवड समितीवर कुलगुरूंचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. ही निवड फलटण एज्युकेशन सोसायटी तसेच मुधोजी महाविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद मानली जात आहे.
प्राचार्य डॉ . पी. एच. कदम यांच्या संशोधन, अध्यापन, पारदर्शक प्रशासन, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम, शिस्त, क्रीडा, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, कार्यक्षमता, कौशल्यवृद्धी कार्यशाळा, विविध सेमिनार तसेच गुणवर्धक शिक्षणोपक्रमांचा विचार करून त्यांची या महत्त्वपूर्ण समितीवर निवड झाल्याचे मानले जात आहे.
गतवर्षी मुधोजी महाविद्यालयाला प्राप्त झालेले ‘नॅक’चे A+ मानांकन हे त्यांच्या नेतृत्वातील उल्लेखनीय कामगिरीचे फलित मानले जाते. नॅक मूल्यांकनासाठी करण्यात आलेली सुसूत्र तयारी, महाविद्यालय परिसराचे सुशोभीकरण, आधुनिक सुविधा, ब्रँडेड कॅम्पस तसेच विविध शैक्षणिक आणि विद्यार्थीकेंद्रित सुविधांच्या वृद्धीसाठी संस्थेच्या सहकार्याने प्राचार्य कदम यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय ठरले आहेत.
त्यांचे सर्वांगपरिपूर्ण व्यक्तिमत्त्व, कार्यक्षमता, सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी आणि सम्यक दृष्टिकोन यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार बदलत्या शैक्षणिक स्पर्धेत महाविद्यालयाला सक्षमपणे टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी केलेली धडपड विशेष उल्लेखनीय आहे.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला त्यांनी दिलेले प्राधान्य, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम, ग्रंथवाचन, लेखन, पर्यावरणपूरक उपक्रम तसेच विविध कौशल्यविकास कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सर्वांगीण विकासाची संधी मिळत आहे.
प्राचार्य निवड समितीवर कुलगुरूंचे प्रतिनिधी म्हणून झालेली त्यांची निवड ही त्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याची दखल घेणारी असून, या जबाबदारीलाही ते निश्चितच योग्य न्याय देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या स्पृहणीय यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे सचिव मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष मा. प्राचार्य विश्वासराव देशमुख, प्रशासनाधिकारी मा. प्राचार्य अरविंद निकम तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुधोजी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व प्रशासकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.