(जावली/ अजिंक्य आढाव ): फलटण तालुक्यातील मौजे बरड येथील रांजणी पुनर्वसन परिसरात बेकायदेशीररीत्या स्फोटके साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी धाडसी कारवाई करत तब्बल 24 लाख 72 हजार 001 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, लोकवस्तीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्फोटके साठविल्याने गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 29 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.50 वाजण्याच्या सुमारास मौजे बरड येथील रांजणी पुनर्वसन परिसरातील बंद मराठी शाळेसमोरील मैदानात उभ्या असलेल्या MH 11 CH 2555 क्रमांकाच्या ट्रकमध्ये बेकायदेशीर स्फोटके साठविल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलिसांनी तातडीने छापा टाकून ट्रकची तपासणी केली.
तपासणीदरम्यान ट्रकमध्ये कोणताही वैध परवाना नसताना लोकवस्तीच्या ठिकाणी निष्काळजीपणे स्फोटके ठेवण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रकमधून Ecoprime 83 mm चे 500 बॉक्स आणि Superpower 90 चे 4 बॉक्स, असे एकूण 504 बॉक्स स्फोटके तसेच संबंधित ट्रक असा एकूण 24,72,001 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 454/2026 नोंद करण्यात आला असून, स्फोटके अधिनियम 1884 चे कलम 9(B)1(B), स्फोटके अधिनियम 1908 चे कलम 5 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 288 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात शंकरलाल बेनीराम जाट (रा. बरड, ता. फलटण) आणि हेमराज महावीर जाट (मूळ रा. भिलवाडा, राजस्थान, सध्या रा. बरड, ता. फलटण) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, हेमराज महावीर जाट याला पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे आणि पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ करीत आहेत.