(जावली/ अजिंक्य आढाव ): विडणी परिसरात महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लूट करणाऱ्या आरोपीकडून शेतकऱ्यांच्या मोटार चोरीचे तब्बल आठ गुन्हे उघडकीस आणण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील विडणी गावातील २४ फाटा परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेऊन चोरी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी अर्धव उर्फ चिन्मय छगन सुतार (वय २०, रा. विडणी, ता. फलटण) यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
फलटण ग्रामीण पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून कौतुक होत आहे.
आरोपीकडून मोटार चोरीसंदर्भातील गुन्ह्यांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे मोटार चोरीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फलटण ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गेल्या दहा दिवसांत विविध गुन्ह्यांचा तपास करून एकूण १४ गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दिपक पवार, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, अमोल गायकवाड, श्रीनाथ कदम, सचिन बावरे, विक्रम बनकर, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस आदींनी कारवाईत सहभाग घेतला.
फलटण ग्रामीण पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून कौतुक होत आहे.